अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात फैजपूरात मोर्चा

फैजपूर, खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी ता. ३० : अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात फैजपूर येथे आयोजित करण्यात आलेला संविधान बचाव महासंघर्ष मोर्चा गुरुवारी भर पावसातही अत्यंत उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. पावसाची पर्वा न करता रावेर व यावल तालुक्यातील विविध गावांमधून नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले. या मोर्चात सुमारे पाच ते सहा हजार नागरिकांनी सहभाग नोंदविला, तर महिलांची उपस्थिती विशेष लक्षणीय व प्रभावी ठरली.
मोर्चाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर “जय भीम… जय संविधान…”, “आंबेडकर… आंबेडकर…” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. भर पावसातही नागरिकांनी मोठ्या उत्साहाने आणि शिस्तीने मोर्चात सहभाग घेत विभागीय कार्यालयाकडे कूच केली.
या मोर्चाचे नेतृत्व अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, रावेर–यावल तालुका यांचे मुख्य समन्वयक अनोमदर्शी तायडे यांनी केले. मोर्चादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना भुसावळ येथील जगनभाऊ सोनवणे तसेच सामाजिक कार्यकर्ते शमीभा पाटील यांनी आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भातील विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली.
यावेळी मुख्य समन्वयक अनोमदर्शी तायडे म्हणाले की, “आमचा लढा कोणत्याही जातीच्या विरोधात नाही. आम्ही आमच्या अनुसूचित जातीतील भावंडांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करीत आहोत. अनुसूचित जातीतील सर्व घटकांना न्याय मिळावा, त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे आणि समाजामध्ये समता व बंधुता टिकून राहावी, हीच आमची भूमिका आहे. मातंग समाजाव्यतिरिक्त इतर ५७ जातींच्या न्याय्य हक्कांसाठी मोठ्या भावाच्या भूमिकेतून आम्ही हा लढा लढत आहोत.”
ते पुढे म्हणाले की, “हा मोर्चा कोणत्याही समाजाच्या विरोधात नसून समाजातील विषमता टिकवून ठेवणाऱ्या वर्णवादी व्यवस्थेविरोधात आहे. संविधानाने दिलेल्या समानता, सामाजिक न्याय आणि बंधुत्वाच्या मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी हा संघर्ष उभारण्यात आला आहे.”
मोर्चा विभागीय कार्यालयात पोहोचल्यानंतर समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. प्रांताधिकारी बबनराव काकडे यांनी निवेदन स्वीकारले. मोर्चादरम्यान पोलिस प्रशासनाने अत्यंत चोख बंदोबस्त ठेवला. त्यामुळे भर पावसातही मोर्चा शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, विविध सामाजिक संघटना, महिला, युवक, कार्यकर्ते आणि रावेर–यावल तालुक्यातील नागरिकांनी मोठे सहकार्य केले. पावसाची पर्वा न करता हजारोंच्या संख्येने उपस्थित राहिलेल्या नागरिकांनी या आंदोलनाला व्यापक प्रतिसाद दिल्याने फैजपूरच्या भूमीतून सामाजिक न्यायाचा आवाज बुलंद झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

