व्यसनाला नाही म्हणा, जीवनाला हो म्हणा चा संदेश
डी.एस. देशमुख विद्यालयात ‘नशामुक्ती प्रतिज्ञा पंधरवडा’ उत्साहात भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी थोरगव्हाण :(ता. रावेर )
भारत सरकारच्या ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत भारत सरकारसोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार तसेच मेडिकल विंग (राजयोगा एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन) यांच्या सहकार्याने दि. ६ ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत देशभर ‘नशामुक्ती प्रतिज्ञा पंधरवडा’ उद्घाटन 8 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. या पंधरवड्यात विविध कार्यक्रम संपन्न होणार आहे. या उपक्रमाचा उद्देश विशेषतः युवक, युवती व विद्यार्थ्यांना व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत जागरूक करून व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रेरित करणे हा आहे. या अभियानांतर्गत व्यसनाला नाही म्हणा, जीवनाला हो म्हणा हा संदेश देण्यात येत आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने दि एज्युकेशन सोसायटी थोरगव्हाण संचलित डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी नशामुक्ती जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी नशामुक्ती मंडळाचे जिल्हा संघटक दयाघन राणे यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या व्यसनांचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगितले. व्यसनांपासून स्वतः दूर राहण्याबरोबरच कुटुंब, मित्रपरिवार व समाजामध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती व प्रबोधन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी ‘व्यसनांना नाही म्हणा व जीवनाला हो म्हणा’ या संदेशाची प्रबोधनात्मक प्रतिज्ञा ज्येष्ठ शिक्षक वाय. जे. कुरकुरे यांनी विद्यार्थ्यांकडून सामूहिकरीत्या वदवून घेतली. कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर, संचालक मधुकर कोल्हे, ज्येष्ठ सदस्य रविंद्र चौधरी व मुख्याध्यापक डी. के. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक नंदकुमार चौधरी होते. सूत्रसंचालन एस. बी. सपकाळे यांनी केले, तर एम. के. पाटील यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी ज्येष्ठ शिक्षक वाय. जे. कुरकुरे, जयश्री चौधरी, एस. बी. सपकाळे, एम. के. पाटील, के. एम. पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संकल्प केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांचे दुष्परिणाम, निरोगी जीवनशैली आणि व्यसनमुक्त समाजनिर्मिती याबाबत जनजागृती होण्यास मोठी मदत झाली.

