रेल्वेत काम करण्यास नकार दिल्याने किन्नरावर घरात घुसून चाकूने हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शहरातील मुस्लिम कॉलनी परिसरात रेल्वेत काम करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका किन्नरावर घरात घुसून मारहाण करून चाकूने वार केल्याची घटना ९ ऑगस्ट रोजी रात्री घडली. या प्रकरणी अर्षद, बाबा काल्या आणि त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध भुसावळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, मुस्कान अतुल पांडे ऊर्फ दीपक वंशकार (२४) या मुस्लिम कॉलनीतील एका घरात अन्य दोन किन्नरांसह भाड्याने राहत आहेत. त्या भुसावळ-रावेरदरम्यान रेल्वेत भिक्षा मागून उदरनिर्वाह करतात. रात्री त्या घरात जेवण तयार करत असताना संशयित आरोपी घरात आले. रेल्वेत काम करण्यास सांगितल्यानंतर नकार दिल्याने आरोपींनी त्यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी अर्षदने त्यांच्या डाव्या गालावर चाकूने वार केल्याने त्या जखमी झाल्या.
भांडण सोडविण्यासाठी पुढे आलेल्या सौम्या यादव यांनाही आरोपींनी मारहाण व शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच रेल्वेत काम करण्यास नकार दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
जखमी अवस्थेत मुस्कान पांडे यांनी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्यांना तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर त्यांनी पुन्हा पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल जुबेर तडवी करीत आहेत.

