हृदयाच्या पानातून ‘वंदे मातरम्’; विद्यार्थ्यांचा राष्ट्रभक्तीचा अनोखा उपक्रम
जळगाव खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी मेहरुण : ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांच्या ऐतिहासिक प्रवासानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे राष्ट्रप्रेम आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम घडवून आणणारा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. ‘वंदे मातरम् – मातृभूमीला हिरवी मानवंदना’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या सहभागाने हा उपक्रम साकारण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांकडून नैसर्गिकरीत्या गळून पडलेली पाने संकलित करण्यात येणार आहेत. या प्रत्येक पानावर ‘वंदे मातरम्’, ‘माझा भारत, माझा अभिमान’, ‘देश प्रथम’, ‘झाडे जपा, भारत जपा’ अशा राष्ट्रप्रेम व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या घोषणा लिहिल्या जातील. संकलित करण्यात आलेल्या १५० पानांच्या माध्यमातून ‘वंदे मातरम्’ किंवा भारताच्या नकाशाची आकर्षक प्रतिकृती साकारण्याचा विद्यार्थ्यांचा मानस आहे.
उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे हृदयाच्या आकाराच्या नैसर्गिक पानातून ‘हृदयात भारत… ओठांवर वंदे मातरम्!’ हा संदेश अधोरेखित करण्यात येणार आहे. ‘वंदे मातरम्’मधील सुजलाम्-सुफलाम् या भावनेचा पर्यावरण संवर्धनाशी संबंध जोडत विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्ती ही केवळ घोषणांपुरती मर्यादित न ठेवता ती प्रत्यक्ष कृतीतून व्यक्त करण्याचा संदेश दिला जाणार आहे.
याचबरोबर ‘१५० पाने – १५० प्रण’ ही संकल्पनाही राबविण्यात येणार आहे.
याअंतर्गत १५० विद्यार्थी पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, पाणी बचत, वृक्षसंवर्धन आणि सामाजिक जबाबदारी यांसारख्या विषयांवर प्रत्येकी एक संकल्प घेणार आहेत.या अभिनव उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेमासोबतच निसर्गाविषयीची संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी रुजविण्याचा विद्यालयाचा प्रयत्न आहे. ‘हृदयात मातृभूमी… कृतीत राष्ट्रभक्ती!’ या संदेशातून देशप्रेमाची भावना पर्यावरण संवर्धनाच्या कृतीशी जोडण्याचा हा उपक्रम ठरणार आहे.

