जळगाव दूध संघाच्या विकासाला नवी दिशा;
आधुनिक प्रशिक्षण केंद्र व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे लोकार्पण
जळगाव : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, जळगावच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. दूध संघाचे संस्थापक चेअरमन तथा महाराष्ट्र राज्याचे माजी गृह राज्यमंत्री स्व. दादासाहेब जे. टी. महाजन यांच्या स्मारकासह शेतकरी प्रशिक्षण केंद्राच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे तसेच मुख्य दुग्धशाळेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या आधुनिकीकरण व वाढीव क्षमता प्रकल्पाचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून दूध संघाच्या माध्यमातून आधुनिक सुविधा, प्रशिक्षण आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याच्या दिशेने या प्रकल्पांकडे महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे. दुग्ध व्यवसायातील बदलती आव्हाने, आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि दूध उत्पादनाची गुणवत्ता यांचा विचार करता शेतकऱ्यांना अद्ययावत मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर नूतनीकरण करण्यात आलेले शेतकरी प्रशिक्षण केंद्र शेतकऱ्यांसाठी ज्ञान, प्रशिक्षण आणि तांत्रिक मार्गदर्शनाचे प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे.
दुग्ध व्यवसायात केवळ दूध संकलन व प्रक्रिया यापुरते मर्यादित न राहता उत्पादनापासून गुणवत्तेपर्यंत आधुनिक पद्धती आत्मसात करणे गरजेचे आहे. पशुपालन व्यवस्थापन, पशूंचे आरोग्य, संतुलित पशुखाद्य, दूध उत्पादनातील गुणवत्ता, आधुनिक दुग्ध व्यवसाय पद्धती तसेच शासनाच्या विविध योजना व तांत्रिक बाबींबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी या केंद्राचा उपयोग होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दूध उत्पादकांना आपल्या व्यवसायात अधिक शास्त्रीय व व्यावसायिक दृष्टिकोन स्वीकारण्यास मदत होईल.
याचबरोबर मुख्य दुग्धशाळेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे आधुनिकीकरण आणि वाढीव क्षमता प्रकल्पही दूध संघाच्या पर्यावरणपूरक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. दुग्ध प्रक्रिया उद्योगातून निर्माण होणाऱ्या सांडपाण्याची शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून पर्यावरणाचे संरक्षण करण्यास या प्रकल्पामुळे हातभार लागणार आहे. वाढत्या दूध प्रक्रिया क्षमतेच्या अनुषंगाने सांडपाणी व्यवस्थापन अधिक सक्षम होणे आवश्यक असून, त्यादृष्टीने करण्यात आलेले हे आधुनिकीकरण महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
दूध संघाचे संस्थापक चेअरमन आणि माजी गृह राज्यमंत्री स्व. दादासाहेब जे. टी. महाजन यांच्या स्मारकाचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. सहकार आणि दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून शेतकरी हितासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण या स्मारकाच्या माध्यमातून कायम राहणार आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी दूध संघाने आधुनिकतेची कास धरावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमास आमदार राजुमामा भोळे, जिल्हा दूध संघाचे चेअरमन आमदार मंगेशदादा चव्हाण, आमदार अमोलदादा जावळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, महापौर दीपमालाताई काळे, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवने, उपमहापौर मनोज चौधरी, शरद महाजन, रविंद्रभैय्या पाटील, विष्णु भंगाळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय जिल्हाभरातून मोठ्या संख्येने दूध उत्पादक शेतकरी, दूध संघाचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि सहकार क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्ह्यातील हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानाशी जोडलेल्या दूध संघाच्या कामकाजाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळत असल्याने आगामी काळात दुग्ध व्यवसायाला अधिक व्यापक आणि सक्षम स्वरूप प्राप्त होण्याची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांना प्रशिक्षण, आधुनिक सुविधा, गुणवत्तापूर्ण दूध उत्पादनासाठी मार्गदर्शन आणि पर्यावरणपूरक प्रक्रिया व्यवस्था या माध्यमातून दूध संघाच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.शेतकऱ्यांच्या हितासाठी आधुनिक सुविधा आणि तंत्रज्ञानाचा संगम घडवून आणणारे हे प्रकल्प जळगाव जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम, शाश्वत आणि स्पर्धात्मक करण्यासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

