वरणगावच्या मुख्याधिकाऱ्यांना भुसावळचा अतिरिक्त पदभार; नगराध्यक्षांचा विरोध भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी वरणगाव ता भुसावळ :
प्रशासकीय कामकाज सुरळीत व वेळेत पार पाडण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी, जळगाव यांनी वरणगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल मनोहर भोये यांच्याकडे भुसावळ नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. हा कार्यभार पुढील आदेशापर्यंत सांभाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार श्री. भोये यांनी आपल्या नियत पदाचा कार्यभार सांभाळून भुसावळ नगरपरिषदेचा अतिरिक्त कार्यभार तात्काळ स्वीकारायचा आहे. या आदेशाची माहिती विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांच्यासह संबंधितांना देण्यात आली आहे.
दरम्यान, वरणगाव नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी या निर्णयाला विरोध दर्शवत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर केले आहे. वरणगाव ही वेगाने विकसित होणारी नगरपरिषद असून शहरात विविध विकासकामे, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि नागरी समस्यांचे निवारण मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
मुख्याधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार दिल्यास वरणगावच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा नगराध्यक्षांनी केला आहे. कर वसुली, स्वच्छता, पाणीपुरवठा, विकासकामांचा नियमित आढावा तसेच नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांची पूर्णवेळ उपस्थिती आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
विशेषतः पावसाळ्यातील परिस्थिती, आपत्कालीन प्रसंग आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रशासकीय प्रमुखांची शहरात उपलब्धता महत्त्वाची असल्याचेही नगराध्यक्षांनी निदर्शनास आणून दिले आहे. अतिरिक्त पदभारामुळे फाईलींचा प्रलंबित साठा वाढून नागरिकांची गैरसोय होऊ शकते, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
जनहित आणि प्रशासकीय सुलभता लक्षात घेऊन वरणगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना इतर कोणत्याही नगरपरिषदेचा अतिरिक्त पदभार देऊ नये आणि त्यांना वरणगाव येथे पूर्णवेळ कार्यरत राहण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
वरणगावच्या मुख्याधिकाऱ्यांकडे भुसावळचा अतिरिक्त कार्यभार देण्याच्या निर्णयावर आता जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

