Tuesday, November 3, 2026
Homeजळगावथोरगव्हाण येथे देशमुख विद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली फटाकेमुक्त दिवाळीची शपथ!

थोरगव्हाण येथे देशमुख विद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली फटाकेमुक्त दिवाळीची शपथ!

थोरगव्हाण येथे देशमुख विद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली फटाकेमुक्त दिवाळीची शपथ!
मुख्याध्यापक डी. के. पाटील यांचे प्रबोधन; राष्ट्रीय हरित सेना प्रमुख वाय. जे. कुरकुरे यांनी दिली शपथ

​     सावदा खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
:
दि एज्युकेशन सोसायटी (स्थापना १९१७) संचलित डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण येथे शालेय परिपाठादरम्यान मंगळवारी (दि. ३ नोव्हेंबर) विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला. या वेळी मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी फटाक्यांच्या दुष्परिणामांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर राष्ट्रीय हरित सेना प्रमुख तथा ज्येष्ठ शिक्षक वाय. जे. कुरकुरे यांनी विद्यार्थ्यांना फटाकेमुक्त दिवाळीची शपथ दिली.
​महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार तसेच मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील

 

शाळांमध्ये ‘प्रदूषणमुक्त दिवाळी अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, प्रदूषण नियंत्रण आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव निर्माण करण्याच्या हेतूने विद्यालयात हा उपक्रम राबविण्यात आला.
​मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी फटाक्यांमुळे उद्भवणारे वायू व ध्वनी प्रदूषण, त्याचे मानवी आरोग्यावर होणारे घातक परिणाम आणि पशुपक्ष्यांना होणारा त्रास यावर सविस्तर प्रकाश टाकला. “दिवाळीचा आनंद द्विगुणित करताना निसर्गाचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.


​यानंतर राष्ट्रीय हरित सेना प्रमुख वाय. जे. कुरकुरे यांनी विद्यार्थ्यांना फटाके न वाजविणे, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करणे, परिसराची स्वच्छता राखणे आणि समाजात प्रदूषणमुक्त दिवाळीचा संदेश पोहोचविण्याची शपथ दिली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाप्रती संवेदनशीलता वाढीस लागली असून, आनंदाचा हा सण निसर्गाला कोणतीही हानी न पोहोचवता साजरा करण्याचा दृढ संदेश या वेळी देण्यात आला.


​या प्रसंगी राष्ट्रीय हरित सेना विभागाचे शिक्षक एम. के. पाटील, के. पी. चौधरी, क्रीडाशिक्षक जे. ए. चौधरी, कलाशिक्षक एस. बी. सपकाळे यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि ‘इको क्लब’चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या