Saturday, August 22, 2026
Homeजळगावभुसावळमध्ये वाहतूक कारवाईच्या नावाखाली ‘तडजोडी’ची चर्चा; वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का?

भुसावळमध्ये वाहतूक कारवाईच्या नावाखाली ‘तडजोडी’ची चर्चा; वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का?

भुसावळमध्ये वाहतूक कारवाईच्या नावाखाली ‘तडजोडी’ची चर्चा; वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का?
भुसावळ   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी         शहरातील वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वाहनांची तपासणी व नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. मात्र, याच कारवाईच्या नावाखाली काही वाहनधारकांकडून मेमो न देता रोख रक्कम घेऊन सोडले जात असल्याच्या तक्रारी व चर्चा सध्या शहरात सुरू आहेत.
ॲपे रिक्षा, मिनी डोअर, काळी-पिवळी वाहने, शालेय विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने, अल्पवयीन मोटारसायकल चालक, परवाना नसलेले वाहनधारक तसेच हेल्मेट न वापरणारे वाहनचालक यांच्यावर कारवाई करताना नियमाप्रमाणे दंडाची पावती किंवा मेमो देणे अपेक्षित असताना, काही प्रकरणांमध्ये शंभर-दोनशे रुपयांची रक्कम घेऊन वाहनधारकांना सोडले जात असल्याची चर्चा आहे.

 


विशेष म्हणजे, नियमभंग करणाऱ्या प्रत्येक वाहनधारकावर समान पद्धतीने कारवाई होत आहे का, असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. कारवाई करताना पारदर्शकता ठेवली जात आहे का, तसेच दंडाची अधिकृत पावती दिली जाते का, याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांबाबत तर नियम अधिक काटेकोर असणे आवश्यक आहे. अल्पवयीन वाहनचालक व परवाना नसलेल्या चालकांबाबतही केवळ तोंडी समज देऊन किंवा कथित आर्थिक तडजोड करून प्रकरणे निकाली काढली जात असतील, तर हा गंभीर प्रकार ठरू शकतो.
दरम्यान, भुसावळ वाहतूक विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांच्या कारवाईची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे पडताळणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. कारवाईदरम्यान जारी केलेले मेमो, अधिकृत दंडवसुलीची नोंद आणि संबंधित वाहनांवरील कारवाईची माहिती तपासल्यास या चर्चेतील सत्यता स्पष्ट होऊ शकते.
या प्रकाराची वरिष्ठ अधिकारी दखल घेऊन चौकशी व आवश्यक ती कारवाई करणार का? याकडे आता भुसावळकरांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या