अन्नसुरक्षा कायदा व शालेय उपक्रमांबाबत मुख्याध्यापकांना मार्गदर्शन
भुसावळ. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
येथील पुंडलिक गणपत बऱ्हाटे माध्यमिक विद्यालयात शिक्षण विभाग यांच्या वतीने अन्न व औषध प्रशासन विभागांतर्गत मुख्याध्यापकांसाठी मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी अन्नसुरक्षा, शालेय पोषण आहार तसेच विविध शैक्षणिक व प्रशासकीय उपक्रमांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, जळगाव दीनानाथ शिंदे आणि अन्नसुरक्षा अधिकारी योगराज सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे , शिक्षण विस्ताराधिकारी तुषार प्रधान, बि.डी. धाडी उपस्थित होते

सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, जळगाव दीनानाथ शिंदे यांनी अन्नसुरक्षा कायदा, नियम व नियमन तसेच अन्नसुरक्षेच्या दृष्टीने घ्यावयाच्या काळजीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
शालेय पोषण आहार अधीक्षक बी. डी. धाडी यांनी शालेय पोषण आहाराबाबत माहिती देताना प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आवश्यक तांदळाच्या साठ्याची माहिती सर्व शिक्षकांना असणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यानंतर गटशिक्षणाधिकारी, किशोर वायकोळे यांनी मुख्याध्यापकांना नवसाक्षरता भारत, इन्स्पायर अवॉर्ड, VSK ॲपवरील विद्यार्थ्यांची उपस्थिती, शालेय परिसर स्वच्छता, SMC स्थापना, तसेच खासगी शाळांमधील कॅन्टीनसाठी आवश्यक नोंदणी प्रमाणपत्र व रजिस्टर याबाबत मार्गदर्शन केले.
शाळेच्या प्रवेशद्वारापासून ५० मीटरच्या परिसरात सॉफ्ट ड्रिंक, चॉकलेट, चिप्स आदी खाद्यपदार्थांची विक्री होऊ नये, स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता करावी, समाजकल्याण शिष्यवृत्तीची कार्यवाही करावी, पाण्याची टाकी दर आठवड्याला स्वच्छ करून त्याचा रेकॉर्ड ठेवावा, तसेच सखी सावित्री, महिला तक्रार निवारण समिती आणि तक्रारपेटी यांची दरमहा बैठक घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

तसेच पोलीस विभागाकडून कॅरेक्टर सर्टिफिकेट प्राप्त करणे, तंबाखूमुक्त शाळा प्रमाणपत्र मिळविणे, प्रशस्त ॲप डाउनलोड करणे, विद्यार्थ्यांचे आधार, APAAR व MBU पूर्ण करून घेणे आदी विविध विषयांवरही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक जे. पी. सपकाळे, मुख्याध्यापक सुरेश अहिरे, मुख्याध्यापक पी. जे. चौधरी तसेच मुख्याध्यापिका हेमांगीनी चौधरी यांची मंचावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैताली चौधरी यांनी केले, तर आभार शालेय पोषण आहार अधीक्षक बी. डी. धाडी यांनी मानले.

