शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रोपांसह कुंड्या देऊन सन्मान


फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
आमोदे येथील घनश्याम काशीराम विद्यालयात शिक्षक दिन उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमोदे शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष विनायकदादा पाटील होते.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने झाली. शाळेचे दैवत साने गुरुजी यांच्या पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण संस्थेचे चिटणीस प्रा. उमाकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण प्रमोद वाघुळदे यांच्या हस्ते करण्यात आले.

आमोदे शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक मंडळातर्फे खाजगी प्राथमिक शाळा, आमोदे तसेच घनश्याम काशीराम विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक दिनाच्या निमित्ताने पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश देत प्रत्येक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यास रोपासह कुंडी भेट देण्यात आली. या उपक्रमातून ‘वृक्षसंवर्धन व पर्यावरण रक्षण’ करण्याचा संदेश देण्यात आला.
इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी सायमा तडवी व आकांक्षा लोखंडे यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांप्रती असलेला आदर व कृतज्ञता व्यक्त केली. पराग पाटील सर यांनी संस्थेने केलेल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

मुख्याध्यापक संजीव बोठे सर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास, शिस्त, आदर्श विचार व आचार याबाबत मार्गदर्शन केले. तसेच पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारावी, असे आवाहन केले. संस्थेचे चिटणीस प्रा. उमाकांत पाटील यांनी आई-वडील, शिक्षक आणि समाजातील मान्यवर व्यक्तींचा आदर करावा. प्रत्येकाने आपल्या वागणुकीतून आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष विनायकदादा पाटील, चिटणीस प्रा. उमाकांत पाटील, शालेय समितीचे चेअरमन प्रमोद वाघुळदे, संचालक धनराज चौधरी, ललित महाजन, नामदेव पाटील व वैभव चौधरी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीची विद्यार्थिनी ओजस्वी तुषार महाजन हिने केले तर आभार प्रदर्शन टीना लक्ष्मण चौधरी हिने केले.

