रावेरमध्ये आरोग्यसेवेची नवी क्रांती कॅन्सर रुग्णांसाठी मोफत किमोथेरप थॅलेसेमियासाठी मोफत रक्तभरण सुविधा माऊली फाउंडेशनचा ऐतिहासिक पुढाकार
रावेर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी मोठ्या शहरांची वाट धरावी लागू नये आणि थॅलेसेमिया रुग्णांना नियमित रक्तभरणासाठी होणारी धावपळ कमी व्हावी, या उद्देशाने रावेरमध्ये आरोग्यसेवेच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
माऊली फाउंडेशनच्या वतीने मोफत कॅन्सर किमोथेरपी सेंटर आणि मोफत थॅलेसेमिया सेंटर सुरू करण्यात येत असून,हा उपक्रम सर्वसामान्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे.
कॅन्सरच्या उपचारांचा वाढता खर्च अनेक सामान्य कुटुंबांसमोर मोठे आर्थिक संकट उभे करतो.
अशा परिस्थितीत किमोथेरपीची अद्ययावत सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय माऊली फाउंडेशनने घेतला आहे. त्याचबरोबर थॅलेसेमिया रुग्णांसाठी नियमित व सुरक्षित रक्तभरणाची सुविधा मोफत उपलब्ध होणार आहे.
रावेरसारख्या ग्रामीण भागात या सुविधा उपलब्ध होणे ही आरोग्यसेवेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब मानली जात आहे. उपचारांसाठी बाहेर जाण्याचा खर्च, वेळ आणि रुग्णांच्या कुटुंबीयांची होणारी धावपळ यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना या सुविधेचा मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.
या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलदादा जावळे यांच्या शुभहस्ते, *डॉ. संदीप पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त करण्यात येणार आहे*.
रविवारी होणार भव्य शुभारंभ
दिनांक : ६ सप्टेंबर २०२६, रविवार
वेळ : सकाळी ११ वाजता
स्थळ : माऊली हॉस्पिटल, रावेर
आरोग्यसेवा ही केवळ उपचारापुरती मर्यादित न राहता ती समाजसेवेचे प्रभावी माध्यम बनावी,या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कॅन्सर आणि थॅलेसेमियासारख्या गंभीर आजारांशी लढणाऱ्या रुग्णांच्या मदतीसाठी रावेरमध्येच मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहे.
या सेवाभावी उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माऊली फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

