Monday, September 7, 2026
Homeगुन्हापोलिसांचा इशारा धुडकावला; गोगाजी महाराजांच्या मिरवणुकीत DJ चालकावर कारवाई !

पोलिसांचा इशारा धुडकावला; गोगाजी महाराजांच्या मिरवणुकीत DJ चालकावर कारवाई !

पोलिसांचा इशारा धुडकावला; गोगाजी महाराजांच्या मिरवणुकीत DJ चालकावर कारवाई !

चोपडा खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – सण-उत्सव, मिरवणुका आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. चोपडा शहरात जाहारवीर गोगाजी महाराज जन्मोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात DJ वाजविणाऱ्या चालकावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली. या DJच्या आवाजाची कमाल तीव्रता तब्बल १२०.९ डेसिबल नोंदविण्यात आली.

जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सण-उत्सव व मिरवणुकांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्यानुसार ६ सप्टेंबर २०२६ रोजी चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाहारवीर गोगाजी महाराज जन्मोत्सवाची मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. मिरवणुकीपूर्वी संबंधित मंडळे व आयोजकांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६८ अन्वये नोटीस बजावून ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मोठ्या क्षमतेच्या डॉल्बी किंवा DJ साऊंड सिस्टीमचा वापर करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले होते.

मात्र, मिरवणुकीदरम्यान रुपम ज्वेलर्स परिसरात मोहिणी DJ बॅन्डचा मालक सचिन उर्फ पिंटू पंडीत शिरसाठ (वय ३७, रा. पंचशील नगर, चोपडा) हा मोठ्या व कर्कश आवाजात DJ वाजवित असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.पोलिसांनी DJ चालकाला ध्वनी प्रदूषण थांबविण्याबाबत समज दिली. मात्र, त्यानंतरही DJ सुरू ठेवण्यात आल्याने पोलिसांनी पंचांसमक्ष Testo कंपनीच्या Noise Level Measuring Instrumentच्या सहाय्याने आवाजाची तीव्रता मोजली.

या तपासणीत LEQ ११५.६ डेसिबल, LAF Max १२०.९ डेसिबल आणि LAF Min ११३.० डेसिबल इतकी ध्वनी तीव्रता नोंदविण्यात आली. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाज आढळून आल्याने पोलिसांनी संबंधित चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई केली.विशेष म्हणजे मिरवणूक शांततेत संपल्यानंतरही संबंधित DJ चालकाने DJ वाजविणे सुरूच ठेवल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.या प्रकरणी सचिन उर्फ पिंटू पंडीत शिरसाठ याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२३, २९२, ३(५), ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) अधिनियम, २००० मधील कलम ३ व ४ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये कारवाई करण्यात आली.

DJ चालकांना पोलिसांचा इशारा

ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या DJ चालकांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जळगाव जिल्हा पोलिसांनी दिला आहे. धार्मिक, सामाजिक किंवा अन्य सार्वजनिक कार्यक्रमांसाठी परवानगी घेताना पोलिसांनी घालून दिलेल्या सर्व अटी व सूचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.मोठ्या आवाजात किंवा निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक तीव्रतेने DJ अथवा साऊंड सिस्टीम वाजवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. नागरिक, मंडळे, मिरवणूक आयोजक आणि DJ चालकांनी पोलिसांना सहकार्य करून सण-उत्सव शांततेत, शिस्तीत आणि आनंदाने साजरे करावेत, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा विभाग सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पवन देसले तसेच त्यांच्या अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या