खंडोबावाडीचा गणनायक महाराज्याचे जल्लोषात आगमन
फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
जय मल्हार गणेश मित्र मंडळ, फैजपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “खंडोबावाडीचा महाराजा” आगमन सोहळा २०२६ रविवारी (दि. ६ सप्टेंबर) अत्यंत उत्साहपूर्ण, भक्तिमय आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला. हजारो गणेश भक्तांच्या उपस्थितीत बाप्पांच्या आगमनाचा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.
सोहळ्याच्या प्रारंभी मंडळाचे मार्गदर्शक व खंडोबावाडीचे उत्तराधिकारी परमपूज्य महामंडलेश्वर पवनदासजी महाराज, तरुणांचे प्रेरणास्थान व फैजपूर नगरपालिका गटनेते श्री सिद्धेश्वर वाघुळदे सर तसेच फैजपूर नगरपालिका उपगटनेते तथा नगरसेवक सूरजदादा गाजरे यांच्या उपस्थितीत शुभहस्ते श्री गणरायाचे विधिवत पूजन व महाआरती करण्यात आली. पूजनानंतर जयघोषाच्या वातावरणात आगमन मिरवणुकीला सुरुवात झाली.
बसस्थानक समोरील गुरुदेव प्लाझा येथून प्रारंभ झालेली मिरवणूक सुभाष चौक, खुशालभाऊ रोड, म्युनिसिपल हायस्कूल परिसर मार्गे खंडोबावाडीचा महाराजा मंडपापर्यंत काढण्यात आली. मार्गभर “गणपती बाप्पा मोरया” च्या गजराने परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत बाप्पांच्या आगमनाचा आनंद साजरा केला.
या भव्य सोहळ्यादरम्यान माजी नगराध्यक्ष निलेश राणे, माजी उपनगराध्यक्ष राकेशदादा जैन, नगरसेवक पवन सराफ, नगरसेवक राहुल गुजराथी यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाने सोहळ्यात सहभाग नोंदवत गणरायाचे दर्शन घेतले.
सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या पेशवा वाद्य पथक, जळगाव यांच्या दमदार वादनाने वातावरण भारावून गेले. ढोल-ताशांच्या गजरात युवकांनी उत्स्फूर्त नृत्य सादर केले. याशिवाय पेपर ब्लास्ट, आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी आणि लायटिंग छत्री यांसारख्या विशेष आकर्षणांनी मिरवणुकीची शोभा अधिक खुलवली. “एक नवीन रूपात…” या संकल्पनेवर साकारलेल्या खंडोबावाडीच्या महाराजांच्या भव्य आणि मनमोहक स्वरूपाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
या भव्य आगमन सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी *जय मल्हार गणेश मित्र मंडळ, फैजपूर येथील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी अनेक दिवस अथक परिश्रम घेतले. मिरवणुकीचे नियोजन,* सजावट, प्रकाश व्यवस्था, सुरक्षेची काळजी, वाहतूक नियंत्रण, भाविकांसाठी सुविधा तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे *शिस्तबद्ध व्यवस्थापन* यासाठी मंडळाच्या प्रत्येक सदस्याने मनापासून योगदान दिले. कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे आणि भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा आगमन सोहळा अत्यंत भव्य, दिव्य आणि संस्मरणीय ठरला.
तसेच या कार्यक्रमासाठी सहकार्य करणारे पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन, प्रसारमाध्यम प्रतिनिधी, हितचिंतक आणि सर्व गणेश भक्त यांचे मंडळाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहे. धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक एकात्मतेचे दर्शन घडविणारा खंडोबावाडीचा महाराजा आगमन सोहळा २०२६ फैजपूरकरांच्या कायम स्मरणात राहील.
“गणपती बाप्पा मोरया… खंडोबावाडीच्या महाराजांचा विजय असो!” या जयघोषात संपूर्ण फैजपूर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.

