ई-साहित्य वाचन-लेखन अभियानास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
येथील धनाजी नाना महाविद्यालय मराठी विभागाच्या वतीने आमोदे येथील घन:श्याम काशीराम विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये ई-साहित्य वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच मोबाईलचा सकारात्मक शैक्षणिक वापर व्हावा या उद्देशाने ‘ई-साहित्य वाचन-लेखन अभियान’ अंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी विभाग प्रमुख डॉ. मनोहर सुरवाडे यांनी प्रास्ताविक करत अभियानाची भूमिका स्पष्ट केली. आजची पिढी मोबाईलच्या आहारी जात असताना त्याच मोबाईलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ई-साहित्य वाचनाची गोडी निर्माण करणे, वाचनानंतर पुस्तकावर स्वतःची प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे कौशल्य विकसित करणे आणि लेखनाची सवय रुजविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
या अभियानात घन:श्याम काशीराम पाटील माध्यमिक विद्यालयातील कु. सायमा फिरोज तडवी व कु. ओजस्वी तुषार महाजन यांनी उत्कृष्ट ई-साहित्य वाचन व लेखन करून उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या गुणवत्तापूर्ण सहभागाबद्दल त्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन जयंत वानखेडे सर यांनी केले, तर डॉ. शरद बिऱ्हाडे यांनी आभार मानले.
याप्रसंगी डॉ. दीपक सूर्यवंशी, प्रा. विजय तायडे, मुख्याध्यापक संजीव बोठे, पराग पाटील, ईश्वर चौधरी, सौ. चारुलता महाजन (पाटील), सौ. अपर्णा सरोदे व भोजू भोई यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

