संगणकशास्त्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर नाहाटा महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागातर्फे सलग १२व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन भुसावळ. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागातर्फे बारावी एक दिवसीय राष्ट्रीय परिषद दि. ०८/०९/२०२६ मंगळवार रोजी आयोजित करण्यात आली. या परीषदेत सुमारे ५२ संशोधक प्राध्यापक तसेच ७८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यात संगणक व माहिती तंत्रज्ञानातील नवीन विचार प्रवाह या विषयावर सखोल असे विवेचन उपस्थित संशोधकांनी केले. या परीषदेचे उदघाटन मा. डॉ. मोहनभाऊ फालक (अध्यक्ष, ताप्ती एज्युकेशन सोसायटी भुसावळ) यांचे शुभहस्ते करण्यात आले. प्रसंगी प्रमुख उपस्थिती मा. श्री. महेशभाऊ फालक (चेअरमन, ताप्ती एज्युकेशन सोसायटी भुसावळ) , मा. श्री. संजयजी नाहाटा (कोषाध्यक्ष ताप्ती एज्युकेशन सोसायटी भुसावळ), प्राचार्य प्रोफेसर डॉ. बी. एच. बऱ्हाटे, प्रमुख वक्ते प्रा. डॉ. संजय इ. पाटे (एन वाय एन सी आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज चाळीसगाव ) , उपप्राचार्य प्रोफेसर डॉ. गजेंद्र आर. वाणी, उपप्राचार्य डॉ. डि. एन.पाटील, परिषद संयोजक प्रा. डॉ. गौरी एम. पाटील आणि प्रा. डॉ. स्वाती पी. फालक, परिषद आयोजक प्रा.डॉ हर्षल व्ही. पाटील,यांची उपस्थिती लाभली.
उद्घाटनाप्रसंगी परिषदेचे उद्घाटक मा. डॉ. मोहनभाऊ फालक यांनी AI(Artificial Intelligence ) ला न घाबरता त्याच्याशी जुळवून घेऊन त्याचा योग्य वापर करणे हे प्रत्येक विद्यार्थ्यांचे ध्येय असायला पाहिजे असे आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना संबोधित केले. प्राचार्य प्रोफेसर डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांनी आपल्या यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पहिल्या राष्ट्रीय परिषदेत केवळ दोन ते तीन टक्के संशोधन अहवाल कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वर आधारित होते. मात्र, बदलत्या काळानुसार आज आयोजित करण्यात आलेल्या बाराव्या राष्ट्रीय परिषदेत जवळजवळ सर्वच संशोधन अहवाल कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंग (ML) या तंत्रज्ञानावर आधारित आहेत.
ही परीषद एकूण तीन सत्रात संपन्न झाली. प्रथम सत्रात प्रा. डॉ. संजय इ. पाटे यांचे बीजभाषण झाले. बीजभाषणात प्रा. डॉ. संजय इ. पाटे यांनी “Research in Computer Science” या विषयावर सविस्तर व अभ्यासपूर्ण असे मार्गदर्शन केले. संशोधन म्हणजे एखाद्या समस्येचा अथवा वास्तव्याचा सखोल अभ्यास करून त्यावर नवीन आणि उपयुक्त उपाय शोधण्याची शास्त्रीय प्रक्रिया होय. यामध्ये समस्या ओळखून, यापूर्वी झालेल्या कामाचा अभ्यास केला जातो आणि त्यातील उणिवा शोधून नवीन पद्धत विकसित केली जाते. त्यानंतर या पद्धतीची प्रयोगांद्वारे तपासणी केली जाते. या संशोधनातून माहितीचा संच(dataset) तयार करून प्रकाशित करता येतो, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान किंवा पद्धत विकसित झाल्यास त्यासाठी एकस्व (patent) मिळवता येते आणि संशोधनाचे निष्कर्ष प्रतिष्ठित वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये प्रकाशित करता येतात ही माहिती सरांनी आपल्या बीज भाषणात दिली.
परिषदेच्या व्दितीय सत्रामध्ये संशोधकानी शोधनिबंधाचे Online व Offline वाचन केले. यावेळी सेशन चेअर म्हणून प्रा. डॉ. वंदना चौधरी, उपप्राचार्य, श्रीमती जी जी खडसे कॉलेज मुक्ताईनगर व प्रा. डॉ. प्रियंका बऱ्हाटे, डी.एन.सी.व्ही.पी कॉलेज जळगाव यांनी शोधनिबंधांचे परीक्षण केले.
परीषदेच्या तिसऱ्या सत्रामध्ये निरोप समारोह संपन्न झाला. याप्रसंगी अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रोफेसर डॉ. गजेंद्र आर. वाणी उपस्थित होते.
सहभागी प्रा. डॉ. सचिन जोशी यांनी परिषदेचे आयोजन अतिशय उत्कृष्टपणे करण्यात आले असे आपल्या अभिप्रायात नमूद केले. सहभागी विद्यार्थिनी तेजल बारी हिने आजची परिषद ही विद्यार्थ्यांना नवनवीन संशोधनासाठी मार्गदर्शक व उपयुक्त झाली असा अभिप्राय दिला. मान्यवरांच्या हस्ते सहभागी संशोधक प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना प्रमाण पत्र वाटप करण्यात आले. तसेच प्रा.गौरी चौधरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
सदर परिषदेचे संयोजक प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रोफेसर डॉ. गजेंद्र आर. वाणी, प्रा. डॉ. गौरी एम. पाटील, प्रा.डॉ. स्वाती पी. फालक आयोजन समिती सचिव प्रा. डॉ. हर्षल व्ही. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सर्व संगणक विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने परिषद यशस्वीरित्या संपन्न झाली.

