Thursday, September 10, 2026
Homeजळगावआत्महत्याग्रस्त व्यक्तींना संवादातून परावृत्त करण्यासाठी प्रशिक्षण

आत्महत्याग्रस्त व्यक्तींना संवादातून परावृत्त करण्यासाठी प्रशिक्षण

आत्महत्याग्रस्त व्यक्तींना संवादातून परावृत्त करण्यासाठी प्रशिक्षण

भुसावळ   खानदेश लाईव्ह  न्युज.  प्रतिनिधी

शहरात गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या आत्महत्यांच्या घटनांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आत्महत्येचा विचार करणाऱ्या व्यक्तीशी योग्य वेळी संवाद साधून त्याला मानसिक आधार देणे गरजेचे आहे. याच उद्देशाने सिव्हिल सोसायटीच्या वतीने ‘अनमोल जीवन, मदतीचा हात करू, आत्महत्येवर मात’ या उपक्रमांतर्गत संवादासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

नगरपरिषदेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुनील काळे होते. यावेळी मुख्याधिकारी राहुल भोये, समुपदेशक दौलत निमसे, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध साळुंखे, अरुण सुरवाडे, प्राध्यापक अनिल शिंदे आदी उपस्थित होते.

शहरातील आत्महत्यांच्या घटनांबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज असून, आत्महत्येचा विचार करणाऱ्या व्यक्तीशी संवेदनशीलपणे संवाद साधल्यास त्याला या टोकाच्या निर्णयापासून परावृत्त करता येऊ शकते. यासाठी कुटुंबीयांसोबतच कौटुंबिक डॉक्टर, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, पत्रकार, शिक्षक, पालक, समाजसेवक तसेच आध्यात्मिक मार्गदर्शक यांना संवादाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पुढील तीन महिन्यांत विविध क्षेत्रातील व्यक्तींसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, यामध्ये पथनाट्य, नैराश्य व ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळा, सोशल मीडिया, शिक्षण तसेच शारीरिक आरोग्य यासंबंधी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.

समुपदेशक दौलत निमसे म्हणाले की, मिळालेले जीवन अनमोल आहे. घरामध्ये संवाद ठेवा, कारण संवादातून अनेक समस्यांवर मार्ग निघतो. आजच्या काळात कुटुंबातील संवाद कमी होत असून विभक्त कुटुंब पद्धतीमुळे अनेकांना एकटेपणा व नैराश्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आलेले दुःख व परिस्थिती स्वीकारा, मेहनत करा आणि समाधानी राहा, ही जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे.

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध साळुंखे यांनी आत्महत्येमागे विविध कारणे असू शकतात, असे सांगितले. चुकीचा जोडीदार निवडणे, आवडीनिवडी व कामातील रस कमी होणे, नकारात्मक विचार, ऊर्जा कमी होणे आणि नैराश्य यांसारख्या बाबींकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. अशा व्यक्तीशी योग्य पद्धतीने संवाद साधल्यास तिला मानसिक बळ मिळू शकते आणि आत्महत्येपासून परावृत्त करण्यास मदत होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

डॉ. राहुल भोईटे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती देताना पुढील तीन महिन्यांत विविध क्षेत्रांतील व्यक्तींना संवाद साधण्याबाबत प्रशिक्षित करण्यात येणार असल्याचे सांगितले.

अध्यक्षीय भाषणात सुनील काळे यांनी सांगितले की नगरपालिकेच्या माध्यमातून पालिकेमध्ये लवकरच कौन्सिलिंग सेंटर सुरू करणार यासाठी सिव्हिल सोसायटी व मानसोपचार तज्ञ यांची मदत घेऊ व माजी जबाबदारी माझे शहर या अभियानाला सुरुवात केली

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत माळी यांनी केले, तर आभार अशोक कळसकर यांनी मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या