Friday, September 11, 2026
Homeजळगावमंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला इनरव्हील क्लबचा सोहळा

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला इनरव्हील क्लबचा सोहळा

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला इनरव्हील क्लबचा सोहळा

विविध महिला ग्रुपचा उत्स्फूर्त सहभाग; दहीहंडी उत्सवात बालगोपालांनी फोडली हंडी

भुसावळ   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी          महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीचे जतन आणि नव्या पिढीपर्यंत तिची ओळख पोहोचविण्याच्या उद्देशाने इनरव्हील क्लब, भुसावळतर्फे ९ सप्टेंबर रोजी मंगळागौरी प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले. नवाशक्ती आर्केडमागील इनरव्हील क्लबच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात भुसावळातील विविध महिला ग्रुप्सनी मंगळागौरीचे पारंपरिक खेळ व नृत्यप्रकार सादर करून वातावरणात उत्साह निर्माण केला. यासोबतच सोलो परफॉर्मन्सचेही आयोजन करण्यात आले होते.

मंगळागौरी म्हणजे महिलांच्या पारंपरिक उत्साहाचे आणि संस्कृतीचे दर्शन घडविणारा उत्सव. सुवासिनींकडून घराची सजावट, पूजा, मेहंदी, गजरा आणि सोळा शृंगार करून फुगडी, रिंगण यांसह विविध पारंपरिक खेळ खेळले जातात. पूर्वी घरातील अंगणात महिलांचा हा उत्सव रंगत असे. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे फ्लॅट संस्कृतीत अंगणे कमी झाली असली तरी महिलांचा उत्साह कायम आहे. नोकरी-व्यवसायातून वेळ काढून महिला एकत्र येत आजही हा उत्सव साजरा करीत आहेत.

पूर्वी मंगळागौरीचे खेळ दादी, आई आणि कुटुंबातील ज्येष्ठ महिलांकडून शिकविले जात होते. आता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्हिडिओ पाहून नव्या पिढीतील महिला हे पारंपरिक खेळ शिकत आहेत. उत्सवाचे स्वरूप बदलले असले तरी त्यामागील भावना आणि परंपरेशी असलेली नाळ कायम असल्याचे या कार्यक्रमातून दिसून आले.कार्यक्रमात विविध महिला ग्रुप्सनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मंगळागौरी स्पर्धेत शिवशक्ती ग्रुपने प्रथम, नेवे समाज ग्रुपने द्वितीय, आनंदी ग्रुपने तृतीय तर श्रावणी ग्रुपने चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. सोलो परफॉर्मन्समध्ये स्वप्नाली घोडके यांना पुरस्कार देण्यात आला.

दहीहंडीने वाढविला उत्साह
जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमात दहीहंडी उत्सवाचेही आयोजन करण्यात आले. बालगोपालांनी श्रीकृष्ण व राधेची वेशभूषा करून उपस्थितांची मने जिंकली. पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडून जन्माष्टमीचा उत्साह साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी स्मिता बियाणी होत्या. यावेळी IIW Treasurer डॉ. रश्मी शर्मा, रजनी सावकारे, मनीषा तायडे, कमल सचदेव, अध्यक्ष सविता शुक्ला, सचिव वैशाली भगत, कल्चरल हेड शीतल भारदे, आयएसओ संगीता जाधवानी यांच्यासह शशि लाहोटी, स्वाती देव, रुचिका शर्मा, प्राची राणे, किरण शुक्ला, मनीषा वानखेडे, वंदिता पारे, वृषाली पाटील, राधिका लाहोटी, पद्मजा दरगड, डॉ. गौरी पाटील, डॉ. नीलिमा तळेले, पूजा फेगडे, अलका ढाके आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अॅडव्हायझरी कमल सचदेव यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या