इनरव्हील क्लबतर्फे चिमुकल्यांसाठी शाडू मातीच्या गणपती निर्मिती कार्यशाळा
४० बालकांचा उत्स्फूर्त सहभाग; पर्यावरण संवर्धनासह सर्जनशीलतेला मिळाली चालना
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच लहान मुलांच्या कलात्मक आणि सर्जनशील क्षमतेला वाव मिळावा, या उद्देशाने इनरव्हील क्लब भुसावळतर्फे १२ सप्टेंबर रोजी गणपती मंदिर, देना नगर येथे ३ ते ८ वर्षे वयोगटातील बालकांसाठी शाडू मातीपासून गणपती मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सायंकाळी ४ वाजता सुरू झालेल्या या उपक्रमात सुमारे ४० बालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी इनरव्हील क्लब भुसावळच्या अध्यक्षा सविता शुक्ला यांनी शाडू मातीपासून गणपतीची मूर्ती तयार करण्याचे महत्त्व बालकांना समजावून सांगितले. शाडू मातीच्या मूर्तीमुळे पर्यावरणाचे रक्षण करण्यास मदत होते, तसेच स्वतःच्या हाताने मूर्ती तयार करण्याच्या प्रक्रियेतून मुलांच्या सर्जनशीलतेला आणि कल्पनाशक्तीला चालना मिळते, असे त्यांनी सांगितले.
यानंतर सहजयोग परिवाराच्या कविता शरद लोहार यांनी सहजयोगाविषयी मार्गदर्शन केले. शरीरातील विविध कुंडलिनी शक्ती जागृत करण्याची प्रक्रिया तसेच एकाग्रता वाढविण्यासाठी सहजयोगाचे महत्त्व त्यांनी बालकांना समजावून सांगितले.

सुरभी नितीन पाटील यांनी प्रारंभी विविध योगप्रकारांची माहिती देत मुलांकडून योगाची प्रात्यक्षिके करून घेतली. त्यानंतर शाडू मातीच्या गणपती मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेला सुरुवात झाली. मोठ्यांकडून मूर्ती तयार करण्याची पद्धत पाहून चिमुकल्यांनीही उत्साहाने शाडू माती हाताळत आपल्या कल्पनेतील गणरायाला आकार दिला. अवघ्या काही वेळात या बालकांनी साकारलेल्या सुंदर गणेशमूर्तींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
या उपक्रमात इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सविता शुक्ला, उपाध्यक्षा पार्वती चांदवानी, सचिव वैशाली भगत, आयएसओ संगीता जादवानी, माजी अध्यक्षा किरण शुक्ला, माजी अध्यक्षा रुचिका शर्मा, डॉ. गौरी पाटील, डॉ. नीलिमा तळेले, पूजा फेगडे यांच्यासह क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी उपाध्यक्षा पार्वती चांदवानी यांनी आभार मानले. सहभागी सर्व बालकांना राजगिरा लाडू आणि चॉकलेट देऊन त्यांचा उत्साह वाढविण्यात आला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

