यावल तालुक्यात खळबळ – पशुवैद्यकीय दवाखान्याच्या जुन्या इमारतीतील शासकीय सामान गायब; चौकशीची मागणी


जुन्या कार्यालयातील फर्निचर, रेकॉर्ड, औषधे आणि इतर साहित्याची विल्हेवाट कुणी लावली? जबाबदार कोण?
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि. १६
यावल शहरातील सातोद रस्त्यावर,भारतीय स्टेट बँकेच्या समोर असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नवीन इमारतीचे बांधकाम गेल्या तीन-चार महिन्यांपासून सुरु आहे. जुनी इमारत जीर्ण झाल्याने ती पाडून त्याच जागेवर नवीन सुसज्ज इमारत उभारली जात आहे, ही बाब स्वागतार्ह असली तरी जुन्या इमारतीमधील कार्यालयीन साहित्याची विल्हेवाट कुणी आणि कशी लावली? यावरून संपूर्ण यावल तालुक्यात जोरदार चर्चा आणि उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.
नेमके प्रकरण काय?
पशुवैद्यकीय दवाखान्याची जुनी इमारत अत्यंत जीर्ण झाली होती. त्यामुळे शासनाने ती पाडून नवीन इमारत बांधण्यास मंजुरी दिली. ठेकेदाराने कामही सुरु केले आहे. परंतु धक्कादायक बाब म्हणजे, जुनी इमारत पाडण्यापूर्वी त्यातील कार्यालयीन टेबल-खुर्च्या, कपाटे, पशु औषधांचा साठा, महत्त्वाचे शासकीय दस्तऐवज, रजिस्टर, आणि इतर साहित्य कोणत्या ठिकाणी हलविण्यात आले? याची कोणतीही अधिकृत माहिती फलकावर किंवा कार्यालयात लावण्यात आलेली नाही.
प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले की, इमारत पाडताना काही साहित्य उघड्यावर पडलेले होते, काही साहित्य खासगी वाहनातून नेण्यात आले. ते साहित्य शासकीय नियमानुसार दुसऱ्या शासकीय कार्यालयात जमा केले की, त्याची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली? असा सवाल पशुपालक आणि नागरिक उपस्थित करीत आहेत.
उपस्थित होत असलेले गंभीर प्रश्न या संपूर्ण प्रकारामुळे यावल तालुक्यात जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत –
१. साहित्याची नोंद कुठे आहे ? : जुन्या इमारतीतील सामानाची अधिकृत यादी (पंचनामा) करून ते दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे का?
२. सुरक्षित ठिकाण कोणते? : जर सामान हलविले असेल तर ते कोणत्या शासकीय कार्यालयात सुरक्षित ठेवले आहे ? त्याची जबाबदारी कुणाकडे सोपविली आहे?
३. बेपत्ता वस्तूंचे काय? : जर महत्त्वाचे रेकॉर्ड किंवा वस्तू बेपत्ता झाल्या असतील तर त्याला जबाबदार कोण? यावर गुन्हा दाखल होणार का?
४. लिलाव प्रक्रिया झाली का ? : शासकीय नियमानुसार भंगार किंवा निरुपयोगी साहित्याचा लिलाव करणे आवश्यक असते, तशी कोणतीही प्रक्रिया राबविली गेली का?
पशुपालकांमध्ये नाराजी
यावल तालुका हा शेतीप्रधान आणि पशुपालन मोठ्या प्रमाणावर असलेला तालुका आहे. पशुवैद्यकीय दवाखाना हा शेतकऱ्यांसाठी आधार आहे. “नवीन इमारत होणे गरजेचे होते, पण जुन्या इमारतीतील शासनाच्या मालमत्तेची अशी हेळसांड होणे योग्य नाही. याची सखोल चौकशी झाली पाहिजे,” अशी प्रतिक्रिया एका जेष्ठ पशुपालकाने दिली.
चौकशीची मागणी जोरात
या प्रकरणाची जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जळगाव यांनी तात्काळ दखल घेऊन सखोल चौकशी करावी. सामानाची यादी, हलविलेल्या ठिकाणाचा पंचनामा आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी यावल तालुक्यातील सुजाण नागरिक व शेतकरी वर्गातून होत आहे.
नवीन इमारत बांधकामामुळे शेतकऱ्यांना चांगली सुविधा मिळेल हा आशावाद असला तरी, जुन्या मालमत्तेच्या झालेल्या कथित गैरव्यवहाराची चौकशी होत नाही तोपर्यंत या चर्चेला पूर्णविराम मिळणार नाही, हे मात्र निश्चित.
यावल येथे पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम बिन-बोर्डाचे; पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह.
यावल शहरात सातोद रोडवर पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू झाले असले तरी, या ठिकाणी शासन नियमानुसार लावणे बंधनकारक असलेला माहिती फलकच ठेकेदाराने लावला नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
शासकीय बांधकामाच्या ठिकाणी कोणत्या योजनेतून, कोणत्या विभागामार्फत, किती निधीचे बांधकाम होत आहे, कामाचा कार्यादेश कोणाला दिला आहे, कामाची मुदत किती आहे, या सर्व बाबींचा उल्लेख असलेला फलक लावणे बंधनकारक आहे. मात्र येथे कोणताही फलक न लावताच काम सुरू असल्याने हे बांधकाम नेमके कोणत्या निधीतून आणि किती खर्चाचे आहे, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे.
निधीचा तपशील जाहीर न केल्याने कामाच्या दर्जाबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. संबंधित विभागाने तात्काळ याची दखल घेऊन माहिती फलक लावण्याचे आदेश द्यावेत आणि बांधकामाच्या पारदर्शकतेबाबत खुलासा करावा, अशी मागणी पशुपालक आणि नागरिकांमधून होत आहे.

