बाळंतपणाच्या रजेचा प्रलंबित पगार तातडीने द्या
जळगाव : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सफाई कामगार सौ. ललिता दिनेश चावरिया यांच्या बाळंतपणाच्या रजेचा प्रलंबित पगार तातडीने अदा करण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाकडे करण्यात आली आहे.
ललिता चावरिया या जळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील वार्ड क्रमांक २ मध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. शासन निर्णयानुसार त्यांनी बाळंतपणासाठी रजा घेतली होती. मात्र, रजेच्या कालावधीतील पगाराची रक्कम अद्याप मिळालेली नसल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.
याबाबत संबंधित विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला असून, वैद्यकीय दवाखान्याची आवश्यक संपूर्ण फाईलही सादर करण्यात आली आहे. तरीदेखील पगाराची रक्कम प्रलंबित आहे. बाळंतपणासाठी घेतलेल्या कर्जामुळे संबंधित महिला कर्मचाऱ्यावर आर्थिक संकट निर्माण झाले असून, त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन पगार तातडीने मिळणे आवश्यक असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.
या प्रकरणाची आपल्या स्तरावर चौकशी करून शासन नियमानुसार प्रलंबित पगाराची रक्कम लवकरात लवकर मिळवून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनु सारवान यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव संदीप बाजू तसेच प्रदेश सचिव संतोष बाबू थामेत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



