हतनूरच्या तापी नदीपात्रात कायमस्वरूपी विसर्जन घाट उभारावा!
पुलावरून मूर्ती विसर्जनाची वेळ संपवा; भाविकांना सुरक्षित व सन्मानजनक सुविधा द्या : नगराध्यक्ष सुनील काळे यांची मागणी
वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी वरणगाव शहरासह भुसावळ व रावेर तालुक्यातील अनेक भाविक गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवादरम्यान हतनूर येथील तापी नदी परिसरात मूर्ती विसर्जनासाठी येतात. मात्र, सध्या विसर्जनासाठी योग्य घाटाची सुविधा नसल्याने भाविकांना पुलावरूनच गणेशमूर्ती व देवीच्या मूर्ती नदीपात्रात विसर्जित कराव्या लागत आहेत. या गंभीर प्रकाराला कायमचा आळा घालण्यासाठी हतनूर येथील तापी नदीपात्रात शासनाने सुसज्ज व सुरक्षित विसर्जन घाट उभारावा, अशी जोरदार मागणी वरणगाव नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील रमेश काळे यांनी केली आहे.
दहा दिवस मनोभावे पूजा-अर्चा करून ज्या गणरायाला आणि देवीमातेला भक्त निरोप देतात, त्याच मूर्तींचे विसर्जन करताना सुरक्षित मार्ग, पायऱ्या अथवा आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. पुलावरून मूर्ती खाली सोडण्याची वेळ येणे ही धार्मिक भावनांबरोबरच सुरक्षिततेच्याही दृष्टीने गंभीर बाब असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.
“दहा दिवस बाप्पाची आणि देवीमातेची मनोभावे सेवा करून शेवटचा निरोप जर अशा अडचणी आणि असुरक्षित परिस्थितीत द्यावा लागत असेल, तर ही परिस्थिती बदलली पाहिजे. भाविकांना श्रद्धेने, सुरक्षितपणे आणि सन्मानपूर्वक मूर्ती विसर्जन करता यावे, यासाठी हतनूर येथे कायमस्वरूपी विसर्जन घाट उभारणे काळाची गरज आहे,” असे सुनील काळे यांनी स्पष्ट केले.
घाट उभारल्यास भाविकांसाठी सुरक्षित पायऱ्या, नदीपात्रापर्यंत जाण्याची सुविधा आणि आवश्यक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे पुलावरून मूर्ती विसर्जन करण्याची पद्धत बंद होऊन धार्मिक भावना जपत पर्यावरणपूरक व शिस्तबद्ध विसर्जनाची व्यवस्था निर्माण होईल.
या मागणीसाठी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधणार असल्याचे काळे यांनी सांगितले.
“हतनूर विसर्जन घाट झालाच पाहिजे!” या मागणीसाठी नागरिक, गणेश मंडळे, देवी मंडळे आणि भाविकांनी एकत्र येऊन लोकचळवळ उभी करावी, असे आवाहनही नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केले आहे.



