लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या जळगावच्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू


जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – मुंबई येथील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या जळगावातील २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (१७ सप्टेंबर) रात्री घडली. जयदीप मेघराज नेमाडे (वय २५, रा. जीवनमोती सोसायटी, शिरसोली रोड, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
जयदीप नेमाडे हा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबई येथे गेला होता. दर्शनासाठी गेल्यानंतर अचानक त्याची प्रकृती बिघडली. त्याला अस्वस्थ वाटू लागल्याचे लक्षात येताच तेथील पोलिसांनी तत्काळ मदत करून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.दरम्यान, रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, गुरुवारी रात्री सुमारे ११.४० वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती जळगावातील कुटुंबीयांना मिळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.
जयदीपच्या आकस्मिक निधनामुळे जीवनमोती सोसायटी तसेच शिरसोली रोड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

