Sunday, September 20, 2026
Homeजळगावलग्नाला अवघा महिना; अभियंता तरुणाचा रेल्वेसमोर मृत्यू !

लग्नाला अवघा महिना; अभियंता तरुणाचा रेल्वेसमोर मृत्यू !

लग्नाला अवघा महिना; अभियंता तरुणाचा रेल्वेसमोर मृत्यू !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शहरातील गणेश कॉलनी परिसरातील गौरव हरीशचंद्र देशमुख (वय २८) या अभियंता तरुणाचा रेल्वेसमोर मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (१८ सप्टेंबर) पहाटे उघडकीस आली. गौरवचे अवघ्या महिनाभरापूर्वी लग्न झाले होते. या प्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गौरव देशमुख हा अभियंता असून बांधकाम मक्तेदारीचे काम करीत होता. गुरुवारी दिवसभर तो कामाच्या ठिकाणी होता. रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास तो बजरंग बोगद्याजवळ गेला. त्यानंतर रेल्वेसमोर आल्याने त्याचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिस चौकीचे पोहेकॉ. किरण बारी व गणेश राजपूत यांनी घटनास्थळी धाव घेतली. गौरवला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनास्थळी गौरवचा तुटलेला मोबाईल आणि दुचाकी आढळून आली. पोलिसांनी मोबाईलमधील सिमकार्ड दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकून संपर्क साधल्यानंतर कुटुंबीयांना घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत गौरवची ओळख पटवली.गौरव हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील हरीशचंद्र देशमुख हेही अभियंता असून शहरात दोघांचे बांधकामाशी संबंधित काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.विशेष म्हणजे, गौरवचे १६ ऑगस्ट रोजी लग्न झाले होते. घटनेच्या आदल्या दिवशी त्याने पत्नी व कुटुंबीयांसोबत लग्नाचा अल्बम पाहिला होता. तसेच गुरुवारी रात्री तो गणेश मंडळाच्या ठिकाणी जाऊन तरुणांसोबत नाचलाही होता. त्यानंतर काही तासांतच ही घटना घडली.

गौरवने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास लोहमार्ग पोलिस करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या