भक्ती आणि कर्तव्यानेच यश मिळते : महामंडलेश्वर जनार्दन महाराज
फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी

जळगाव सतपंथ शिष्यवृत्ती प्रकल्पातील गणरायाचे जनार्दन महाराज यांच्या उपस्थितीत विसर्जन…
गरीब, होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून सक्षम करण्याच्या उद्देशाने सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट आणि नोबेल फाउंडेशनच्या वतीने जळगाव येथे सतपंथ शिष्यवृत्ती प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातील ग्रामीण भागातील ५० विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षांची तयारी करीत आहेत. या विद्यार्थ्यांनी प्रतिष्ठापना केलेल्या गणरायाचे विसर्जन परमपूज्य महामंडलेश्वर श्री जनार्दन महाराज यांच्या उपस्थितीत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी ज्ञान उत्सवाच्या आयोजन करण्यात आले होते यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विद्यार्थ्यांची संवाद साधला यात राज्यकर अधिकारी राहुल पाटील,शीतल पाटील, सहा.पोलीस निरीक्षक राजश्री पाटील, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते राजू बाविस्कर, अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ किरण देसले, स्वयंदीप
प्रतिष्ठानचे श्री संदीप पाटील,श्री देवल पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी जनार्दन महाराज यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी गणरायाच्या रूपातील प्रत्येक प्रतीक विद्यार्थ्यांना जीवनाचा एक महत्त्वाचा धडा देत असल्याचे सांगितले.

गणरायाच्या प्रत्येक अवयवातून जीवनाचा संदेश…
“गणपती ही बुद्धीची देवता आहे. विद्यार्थ्यांनी गणरायाची केवळ पूजा न करता त्यांच्याकडून जीवन जगण्याची कला शिकली पाहिजे,” असे जनार्दन महाराज यांनी सांगितले.
*गणरायाच्या मोठ्या कानांकडे लक्ष वेधत त्यांनी अधिक ऐकण्याचा आणि कमी बोलण्याचा संदेश दिला.* विद्यार्थीदशेत मिळणारे मार्गदर्शन, शिक्षकांचे अनुभव आणि मोठ्या व्यक्तींचे विचार मनापासून ऐकले, तर त्याचा जीवनाला मोठा फायदा होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
गणरायाच्या मातृ-पितृभक्तीचा आदर्श सांगताना त्यांनी विद्यार्थ्यांना आई-वडिलांची सेवा करण्याचे आवाहन केले. “ज्यांनी आपल्यासाठी आयुष्यभर कष्ट घेतले, त्या आई-वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हीसुद्धा भक्तीच आहे,” असा भावपूर्ण संदेश त्यांनी दिला.
गणरायाच्या मोठ्या उदरातून संयम आणि आत्मनियंत्रणाचा धडा मिळतो, असे सांगत त्यांनी तरुणांनी आपल्या भावना, राग, इच्छा आणि प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले. आयुष्यात अनेक प्रसंग येतात; मात्र प्रत्येक प्रसंगाला तात्काळ प्रतिक्रिया देण्याऐवजी संयमाने निर्णय घेणे हीच खरी बुद्धिमत्ता आहे, असे त्यांनी सांगितले.
दहा दिवसांची भक्ती, वर्षभराची कर्तव्यनिष्ठा…
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांमधून विद्यार्थ्यांनी केवळ धार्मिक ऊर्जा न घेता अभ्यास, शिस्त आणि ध्येयपूर्तीची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन जनार्दन महाराज यांनी केले.
“ही दहा दिवसांची ऊर्जा केवळ उत्सवापुरती मर्यादित ठेवू नका. ती वर्षभर आपल्या अभ्यासासाठी, आपल्या ध्येयासाठी आणि आपल्या कर्तव्यपूर्तीसाठी वापरा,” असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी त्यांनी भक्ती आणि कर्तव्य यांचा संबंध स्पष्ट करत सांगितले, “केवळ मूर्तीची भक्ती करून जीवनात यश मिळत नाही. मूर्तीसमोर हात जोडतानाच आपल्या कर्तव्याप्रतीही निष्ठा ठेवावी लागते. भक्तीला कर्तव्याची जोड मिळाली, तरच जीवनाला खऱ्या अर्थाने दिशा मिळते.”
हा संदेश विद्यार्थ्यांसाठी गणेशोत्सवाच्या सांगतेचा जणू जीवनमंत्र ठरला.
यानंतर ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. भक्तिमय वातावरणात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
यावेळी नोबेल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जयदीप पाटील, संचालक राजेंद्र पाटील, रमेश पाटील, प्रशांत तायडे , जगदीश पाटील यांच्यासह सतपंथ शिष्यवृत्ती प्रकल्पातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

