Saturday, September 26, 2026
Homeजळगावजनगणना २०२७च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

जनगणना २०२७च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

जनगणना २०२७च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

घरयादी, प्रगणक गट, सीमांकन व जिओ-टॅगिंगबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन

जळगाव    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी      : जनगणना २०२७ची अचूक, प्रभावी आणि वेळेत अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. राज्य शासनाच्या जनगणना संचालनालय आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा प्रधान जनगणना अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण घेण्यात आले.जिल्हाधिकारी तथा जिल्हा प्रधान जनगणना अधिकारी रोहन घुगे यांच्या निर्देशानुसार आणि प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी महेश चौधरी यांच्या समन्वयातून प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

जनगणना संचालनालयाचे सहायक संचालक अजय ठाकूर आणि श्रीकांत बनकर यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणाला जिल्ह्यातील तहसीलदार तथा चार्ज अधिकारी, महानगरपालिका अधिकारी, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी तथा चार्ज अधिकारी, नगरपंचायत अधिकारी, महसूल सहायक अधिकारी, तांत्रिक सहायक तसेच चार्ज अधिकाऱ्यांचे लिपिक उपस्थित होते.

घरयादीपासून जिओ-टॅगिंगपर्यंत मार्गदर्शन
प्रशिक्षणात घरयादी व घरगणना तयार करण्याची प्रक्रिया, प्रगणक गट निश्चित करण्याची सर्वसाधारण तत्त्वे, सीएमएमएस प्रणालीमध्ये प्रगणक गट तयार करण्याची कार्यपद्धती, घरयादी गट व उपगट तयार करणे, मांडणी दर्शक नकाशाचे पुनरावलोकन, गणना घरांची निवड व वाटप, प्रगणक गट ‘फ्रीज’ करणे, उपगटांचा समावेश तसेच उपगटांचे सीमांकन आणि जिओ-टॅगिंग याबाबत पीपीटीच्या माध्यमातून सविस्तर माहिती देण्यात आली.

प्रश्नावलीतील प्रश्नांची संख्या वाढली
जनगणना २०२७मध्ये नैसर्गिक सीमांच्या व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात येणार आहे. मागील जनगणनेच्या तुलनेत प्रश्नावलीतील प्रश्नांची संख्या २८ वरून ४० करण्यात आली असून प्रश्नावली व्यक्तिनिहाय असणार आहे. जनगणना प्रक्रिया अधिक अचूक आणि प्रभावी करण्यासाठी नव्या पद्धतीचा वापर करण्यात येणार असल्याचे प्रशिक्षणात स्पष्ट करण्यात आले.
प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी गावनिहाय लोकसंख्या, घरांची संख्या आणि प्रत्येक प्रगणक गटाची माहिती कागदावर व्यवस्थित नोंदवून नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे पोर्टलवर काम करताना येणाऱ्या अडचणी टाळून प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण करता येईल, असे सांगण्यात आले.

प्रगणक गटाची मर्यादा ८०० लोकसंख्येपर्यंत
यंदाच्या जनगणनेत प्रगणक गटाची लोकसंख्या मर्यादा एक हजारांवरून ८०० करण्यात आली आहे. कामाचा अतिरिक्त ताण कमी करून योग्य नियोजनाच्या दृष्टीने हा बदल करण्यात आला आहे. जनगणनेतील प्रत्येक टप्पा निर्धारित वेळेत पूर्ण करून शेवटच्या टप्प्यात होणारी धावपळ टाळावी, अशा सूचनाही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या.

प्रशिक्षणादरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांनी जनगणना प्रक्रियेबाबत विचारलेल्या विविध प्रश्नांना तज्ज्ञांनी उत्तरे देत शंकांचे निरसन केले. निर्धारित वेळापत्रक आणि कार्यपद्धतीनुसार सर्व संबंधित यंत्रणांनी अचूकपणे काम पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जनगणना शाखेचे सहायक महसूल अधिकारी ए. पी. जोशी, सुनिता खडके, किशोर पाटील, राजेश जाधव, हर्षदा वैद्य आणि उदय लोखंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या