अमरावतीतील गुन्ह्यातील २० वर्षीय संशयित भुसावळात ताब्यात !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – अमरावती जिल्ह्यातील दत्तापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील २० वर्षीय संशयिताला भुसावळ शहरातील वाल्मीक नगर परिसरातून दत्तापूर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. याबाबतची नोंद भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात २४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ९.२८ वाजता करण्यात आली आहे.

दत्तापूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. ३०२/२०२६ दाखल असून, भारतीय न्याय संहितेतील कलम ७४, ७८, ७९ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६७ अंतर्गत कारवाई सुरू आहे. या प्रकरणात महिला अत्याचार, महिलेचा पाठलाग करणे आणि अश्लील शिवीगाळ करणे यांसंदर्भातील आरोप असल्याची माहिती पोलिस नोंदीत आहे.
या गुन्ह्यातील संशयित नकुल विनोद कल्याणे (वय २०, रा. वाल्मीक नगर, भुसावळ) हा भुसावळ येथे असल्याची माहिती दत्तापूर पोलिसांना मिळाली. त्यानंतर दत्तापूर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश कावळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी सोनू भालेराव, धीरज इंगळे आणि प्रकाश दांडगे यांच्या पथकाने भुसावळ गाठले.पोलिसांनी वाल्मीक नगर परिसरात शोध घेतला असता संशयित मिळून आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले तसेच त्याच्या कुटुंबीयांना गुन्ह्याची माहिती देण्यात आली.यानंतर दत्तापूर पोलिसांनी संशयिताला भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात आणले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला दत्तापूर पोलिस ठाणे, जिल्हा अमरावती येथे नेण्यात आल्याची नोंद बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या दप्तरी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची सत्यता न्यायालयीन प्रक्रियेत निश्चित होणार असून, संशयितावरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत.

