पारंपरिक गणेशोत्सवात केरळच्या चेंडा मेलमचा निनाद
फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी आदर्श व पारंपरिक गणेशोत्सवाची परंपरा जपत, प.पू. महामंडलेश्वर श्री. जनार्दन हरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सतपंथ नवयुवक गणेश मित्र मंडळ, फैजपूर यांच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त केरळ येथील सुप्रसिद्ध पारंपरिक वाद्यकला चेंडा मेलम’ चे विशेष आयोजन करण्यात आले.

भारतीय संस्कृती, परंपरा आणि लोककलेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा तसेच गणेशोत्सवाच्या माध्यमातून पारंपरिक कला व संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने मंडळाने हा अभिनव उपक्रम आयोजित केला. केरळच्या पारंपरिक वाद्यांचा तालबद्ध आणि उत्साहपूर्ण संगम असलेले चेंडा मेलम हे या गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले.

गणेशोत्सव हा केवळ उत्सव न राहता सामाजिक एकोपा, सांस्कृतिक जतन आणि पारंपरिक कलांना व्यासपीठ देणारा उत्सव व्हावा, यासाठी मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच माध्यमातून महाराष्ट्र आणि केरळच्या समृद्ध लोककला व सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम घडवून आणण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष रोहन चौधरी, उपाध्यक्ष युवराज किरंगे, खजिनदार रितेश भीरुड, तसेच सदस्य हेमंत भारंबे, मयुर भारंबे, ऋषी चौधरी, कुणाल कोल्हे आणि ज्ञानेश्वर सराफ यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
पारंपरिक गणेशोत्सवाची संस्कृती जपत, नव्या पिढीला आपल्या समृद्ध भारतीय परंपरेची ओळख करून देण्याचा सतपंथ नवयुवक गणेश मित्र मंडळाचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.

