गरीब किडनी रुग्ण महिलेच्या मदतीला नंदाताई निकम, प्रकाश निकम
PMJAY योजनेतून उपचार करण्यासाठी डॉक्टरांशी चर्चा; रुग्णाकडून आकारलेल्या बिलावरही सवाल
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या गरीब महिला रुग्णाच्या उपचारासाठी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नंदाताई निकम आणि समाजसेवक प्रकाशभाऊ निकम यांनी धाव घेत सामाजिक बांधिलकी जपली.
भुसावळ येथील सकीनाबी महबूब शेख या महिलेला किडनीच्या आजारामुळे उपचारासाठी जळगाव येथील किडनीतज्ज्ञ डॉ. अमित भंगाळे यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारासाठी तब्बल १ लाख २० हजार रुपयांचे बिल आकारण्यात आल्याचे सांगण्यात आले. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने सकीनाबी यांनी उधार पैसे घेऊन हे बिल भरले. मात्र पुढील उपचारांचा खर्च परवडत नसल्याने त्यांच्यासमोर मोठे संकट निर्माण झाले.

उपचारासाठी आर्थिक अडचण निर्माण झाल्यानंतर सकीनाबी यांनी भुसावळ येथील शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नंदाताई निकम आणि समाजसेवक प्रकाशभाऊ निकम यांच्याशी संपर्क साधला. परिस्थितीची माहिती मिळताच दोघांनी विलंब न करता जळगाव गाठून संबंधित डॉक्टरांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत सदर महिलेवर उपचार करण्याबाबत डॉक्टरांशी चर्चा केली. गरीब रुग्णाला उपचारापासून वंचित ठेवू नये, तसेच योजनेच्या माध्यमातून तिच्या पुढील उपचाराची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी रुग्णाकडून आकारण्यात आलेल्या मोठ्या बिलाबाबतही त्यांनी डॉक्टरांकडे जाब विचारला.
चर्चेनंतर संबंधित महिलेचा पुढील उपचार PM-JAY योजनेअंतर्गत करण्याचे आश्वासन डॉक्टरांकडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या सकीनाबी यांना मोठा दिलासा मिळाला.
या मदतीसाठी सकीनाबी महबूब शेख यांनी नंदाताई निकम आणि प्रकाशभाऊ निकम यांचे आभार मानले. आर्थिक परिस्थितीमुळे उपचार थांबण्याची वेळ आलेल्या रुग्णासाठी दोघांनी केलेली धावपळ आणि पाठपुरावा हा सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय देणारा ठरला.


