ज्येष्ठ नागरिकांनी सायबर फसवणुकीपासून सावध राहावे : डीवायएसपी केदार बारबोले
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
ज्येष्ठ नागरिकांनी सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांपासून सावध राहावे तसेच अनोळखी व्यक्तींचे फोन, लिंक, ओटीपी आणि बँक खात्याशी संबंधित माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी केले.
श्री गुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघाच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त नाहाटा कॉलेजच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम. के. पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून डीवायएसपी केदार बारबोले, फेस्कॉमचे जिल्हा समन्वयक एस. बी. महाजन, जोगी साहेब, संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश विसपुते, उपाध्यक्ष महादेव हरीमकर, कोषाध्यक्ष राजेंद्र गवळी, सचिव बी. डी. चौधरी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात गुरुदेव दत्त व शारदा मातेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. महादेव हरीमकर यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. बी. डी. चौधरी यांनी संघामार्फत वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. राजेंद्र गवळी यांनी वर्षभराचा लेखाजोखा सादर केला.
यावेळी मार्गदर्शन करताना डीवायएसपी केदार बारबोले यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्याचे कौतुक केले. ज्येष्ठ नागरिकांनी संघटित राहणे गरजेचे असून, सतत कार्यरत राहून विविध छंद जोपासावेत, असे त्यांनी सांगितले. सध्या सायबर फसवणुकीच्या घटना वाढत असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांशी व कायद्याशी संबंधित महत्त्वपूर्ण बाबींवरही त्यांनी मार्गदर्शन केले.
फेस्कॉमचे जिल्हा समन्वयक एस. बी. महाजन यांनी फेस्कॉमच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश विसपुते यांनी सर्वांच्या सहकार्याने संघाची स्थापना झाली असून, प्रत्येक सदस्याला नेतृत्वाची संधी मिळावी, या उद्देशाने संघाचे कार्य सुरू असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात एम. के. पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या तसेच त्यासाठी पोलीस विभागाकडून मिळणाऱ्या सहकार्याबाबत विचार मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. डी. चौधरी यांनी केले, तर आभार राजेंद्र गवळी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री गुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघाचे आर एन पाटील , पी . ओ . तायडे , रावते सर , भास्कर सोनवणे ,डी एस पाटील , विजय चौधरी ,मंगल येवले, साधना मोहरील ,जयश्री विसपुते , पदाधिकारी, सदस्य व महिला सदस्यांनी परिश्रम घेतले.


