इगतपुरी गोळीबार प्रकरणात संशयितांची टोळी जेरबंद
नाशिक ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन चॉपर व वाहने जप्त

नाशिक खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – इगतपुरी तालुक्यातील गोंदे एमआयडीसी परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयितांच्या टोळीला ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालेगावकडून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या मारुती सुझुकी एर्टिगा वाहनाला सापळा रचून पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा आणि दोन धारदार चॉपर जप्त करण्यात आले आहेत.
गोळीबाराच्या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक संशयितांचा शोध घेत होते. तपासादरम्यान काही संशयित एर्टिगा वाहनातून मालेगावकडून नाशिकच्या दिशेने येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी महामार्गावर सापळा रचला.
संशयित वाहन येताच पोलिसांनी ते अडवून वाहनातील मयूर मोहन जाधव, करण सोपान आवारे, ओंकार शरद भोसले, रोशन धोंगडे तसेच एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता एक गावठी कट्टा आणि दोन चॉपर आढळून आले. याशिवाय गोळीबाराच्या गुन्ह्यात वापरण्यात आल्याचे सांगितलेली मोटरसायकलही पोलिसांनी जप्त केली.
या कारवाईमुळे गोंदे एमआयडीसी परिसरातील गोळीबाराच्या घटनेच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे. गोळीबारामागील नेमके कारण काय होते, आर्थिक व्यवहार अथवा जुने वैमनस्य याचा संबंध आहे का, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांच्या आदेशानुसार व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुदर्शन बोडके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार प्रवीण काकड, संदीप नागपुरे, हेमंत गिलबिले, सचिन धारनकर, मयूर कांगणे, दीपक गुंजाळ, सतीश घुगे, संतोष गांगुर्डे, शिवाजी ठोंबरे, प्रवीण गांगुर्डे व माधव साळे यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.
गोळीबार प्रकरणातील संशयित ताब्यात आल्याने पोलिसांच्या तपासाला वेग आला असून या कारवाईतून प्रकरणातील इतर कड्या उलगडण्याची शक्यता आहे.

