Thursday, October 1, 2026
Homeजळगाव५६.०३ कोटींची यावल पाणीपुरवठा योजना प्रगतीपथावर ; ५० टक्के काम पूर्ण.

५६.०३ कोटींची यावल पाणीपुरवठा योजना प्रगतीपथावर ; ५० टक्के काम पूर्ण.

५६.०३ कोटींची यावल पाणीपुरवठा योजना प्रगतीपथावर ;
५० टक्के काम पूर्ण.

“फेब्रुवारी-मार्चमध्ये नवीन योजनेतून यावलकरांना पाणी देण्याचा विश्वास” — अतुलभाऊ पाटील.

यावल      खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी       दि.१
यावल शहराच्या भविष्यातील वाढत्या पाणी गरजा लक्षात घेऊन महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत मंजूर झालेल्या ५६.०३ कोटी रुपयांच्या यावल शहर पाणीपुरवठा योजनेचे काम सध्या प्रगतीपथावर असून, आता पर्यंत सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती पाहणी दरम्यान देण्यात आली.

तापी नदीकाठी शेळगाव बॅरेज परिसरातील टाकरखेडा गावाजवळ उद्भव घेऊन शहराला पाणीपुरवठा करण्याच्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे यावलच्या भविष्यातील पाणीप्रश्नाला कायमस्वरूपी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
योजनेला १२ जुलै २०२४ रोजी तांत्रिक मान्यता, तर १५ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यानंतर २३ मे २०२५ रोजी मे. एस.सी.आय.पी.एल. व संदीप कन्स्ट्रक्शन (JV), गंगाखेड यांना कार्यादेश देण्यात आला.

योजनेची मूळ निविदा किंमत सुमारे ४३.८९ कोटी रुपये असून प्रशासकीय मंजुरीची किंमत ५६.०३ कोटी रुपये आहे.
शेळगाव बॅरेजजवळ उभारणीचे महत्त्वाचे काम योजनेचा उद्भव ( शेळगाव बँरेज मधून पाणी घेण्याचे / उचलण्याचे ठिकाण ) तापी नदीकाठी शेळगाव बॅरेज येथे टाकरखेडा गावाजवळ घेण्यात आला आहे. या ठिकाणी पाच मीटर व्यासाचे इंटेक वेल, दोन इन्स्पेक्शन वेल,आठ मीटर व्यासाचे जॅकवेल, सुमारे २०० मीटर अप्रोच बंड आणि ६०० मीटर अप्रोच रोड अशी कामे प्रस्तावित आहेत.

नदीतील पाणी इंटेक वेलमार्फत जॅकवेलमध्ये आणण्यासाठी ६०० मि.मी. व्यासाची पाईपलाईन टाकण्यात येत आहे. यातील अप्रोच बंडचे काम पूर्ण झाले असून जॅकवेल व इंटेक वेलचे काम सध्या वेगाने सुरू आहे.
८ किमी जलवाहिनीपैकी ४.१० किमी काम पूर्ण जॅकवेलमधून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी नेण्यासाठी ४०० मि.मी.व्यासाची
सुमारे ८ किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे.त्यात ४.१० किलोमीटरचे
काम पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली.

जॅकवेलमधील पाणी जलशुद्धीकरण केंद्राकडे पाठविण्यासाठी २५० एचपी क्षमतेचा पंप प्रस्तावित आहे. तसेच वीज खर्चात बचत करण्याच्या उद्देशाने १९० केव्ही क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे.

११ दशलक्ष लिटर क्षमतेचे आधुनिक जलशुद्धीकरण केंद्र
या योजनेतील जलशुद्धीकरण केंद्र हे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित राहणार असून त्याची क्षमता ११ दशलक्ष लिटर प्रतिदिन आहे. केंद्रामध्ये प्री-सेटलिंग टँक, Backwashing Mechanism, Compressed Air च्या माध्यमातून फिल्टर बेड स्वच्छ करण्याची यंत्रणा, तसेच Recirculation Sumpच्या माध्यमातून पाण्याचा पुनर्वापर करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

शुद्ध पाण्याच्या टाकीतून ६० एचपी पंपाद्वारे २२ लाख लिटर क्षमतेच्या साने गुरुजी विद्यालया जवळील जलकुंभात, तर ५० एचपी पंपाद्वारे १० लाख लिटर क्षमतेच्या श्रीराम नगर जलकुंभात पाणी पाठविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

जलशुद्धीकरण केंद्रावर १२० केव्ही क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे.

जलशुद्धीकरण केंद्राचे सुमारे ४५ टक्के काम पूर्ण झाले असून, योजनेतील एकूण ५७ किलोमीटर वितरण वाहिनी पैकी २१ किलोमीटरचे काम पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली.
“काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न” — अभियंता अनुराधा पाटील योजनेच्या कामाबाबत पाणीपुरवठा अभियंता अनुराधा पाटील यांनी सांगितले की,सध्या योजनेचे काम प्रगतीपथावर असून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत मंजूर कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.कामाच्या दरम्यान रस्त्याशी संबंधित काही अडचण निर्माण झाली होती; मात्र त्यावरही लवकरच तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“२०२१ मध्ये पाहिलेले स्वप्न आता प्रत्यक्षात येत आहे” .

माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुलभाऊ पाटील यांनी योजना पाहणीनंतर समाधान व्यक्त केले.ते म्हणाले की,२०२१ मध्ये २०५६ सालची संभाव्य लोकसंख्या गृहीत धरून दरडोई १३५ लिटर पाणी उपलब्ध झाले पाहिजे, या संकल्पनेतून या योजनेचे स्वप्न पाहण्यात आले होते.आज हे स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

योजनेचे सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले असून जॅकवेलपासून फिल्टरपर्यंत ४०० मि.मी. तसेच ६००मि.मी.डीआय पाईपलाईनचे
काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.“योजना ५६ कोटी रुपयांची असली तरी आतापर्यंत सुमारे साडेसात कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. निधी उपलब्धतेच्या मर्यादा असतानाही ठेकेदाराने स्वतःच्या आर्थिक सहभागातून काम सुरू ठेवले असून सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे,” असा दावा अतुलभाऊ पाटील यांनी केला.

पूर्वीच्या पारंपरिक फिल्टर व्यवस्थेत गाळ काढण्याचे काम मॅन्युअली करावे लागत होते. नवीन जलशुद्धीकरण केंद्रात यांत्रिकी पद्धतीने गाळ काढण्याची आधुनिक व्यवस्था राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“२०२१ मध्ये पाहिलेले स्वप्न उशिरा का होईना पूर्ण होत आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये नवीन शेळगाव योजनेवरून यावल शहराला पाणी देऊ शकू, असा विश्वास आहे,” असेही अतुलभाऊ पाटील यांनी सांगितले.

नगराध्यक्षा छायाताई पाटील यांच्या उपस्थितीत पाहणी
योजनेच्या कामाची लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.छायाताई अतुल पाटील यांनी पाहणी केली. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुलभाऊ पाटील,पाणीपुरवठा अभियंता अनुराधा पाटील,दादू धोत्रे, पीएमसीचे जैन साहेब,सुमित साहेब यांच्यासह नगरसेवक सागर चौधरी,पराग सराफ, उमरशेठ कच्ची,करीम मन्यार, शिवसेना तालुकाप्रमुख शरद कोळी,शहरप्रमुख जगदीश कवडीवाले,संतोष धोबी,योगेश पाटील,पप्पू जोशी,फारूक हाजी,नरेंद्र शिंदे,भूषण खैरे, किशोर माळी आदी उपस्थित होते.

ठळक मुद्दे –
योजना : ५६.०३ कोटी रुपये
प्रशासकीय मान्यता : १५ ऑक्टोबर २०२४ कार्यादेश : २३ मे २०२५ तांत्रिक मान्यता : १२ जुलै २०२४ ठेकेदार : मे. एस.सी.आय.पी.एल. व संदीप कन्स्ट्रक्शन (JV)
जॅकवेल : ८ मीटर व्यास
जलशुद्धीकरण केंद्र : ११ दशलक्ष लिटर क्षमता
जॅकवेल ते जलशुद्धीकरण केंद्र : ८ किमी पाईपलाईन
पूर्ण झालेले : ४.१० किमी
वितरण वाहिनी : ५७ किमी
पूर्ण झालेले वितरण काम : २१ किमी जलशुद्धीकरण केंद्राचे काम : सुमारे ४५%
एकूण काम सुमारे ५०% पूर्ण झाल्याचा पाहणीदरम्यान दावा
शहराला नवीन योजनेतून पाणी देण्याचे लक्ष्य : फेब्रुवारी-मार्च २०२७ असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या