विभागीय कुस्ती स्पर्धेत गो.पु. पाटील विद्यालयाची दमदार कामगिरी
भडगाव येथील प्रेरणा गणेश पाटील व दिव्या भानुदास पाटील यांना सुवर्ण यश, तनु वाल्मीक पाटील उपविजेती.

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.७
येवला, जि. नाशिक येथे पार पडलेल्या नाशिक विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्था, भडगाव संचलित गोपीचंद पुना पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोळगावच्या कुस्तीपटूंनी आपल्या गुणवत्तेची पुन्हा एकदा दमदार छाप उमटविली. या स्पर्धेत विद्यालयाच्या प्रेरणा गणेश पाटील आणि दिव्या भानुदास पाटील यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकावर नाव कोरले, तर तनु वाल्मीक पाटील हिने अंतिम फेरीत उपविजेतेपद मिळवत रौप्यपदकाची कमाई केली.
विद्यालयाची प्रेरणा गणेश पाटील हिने १९ वर्षांआतील मुलींच्या ५७ किलो वजनी गटात उत्कृष्ट कुस्तीचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आणि विभागीय विजेतेपद पटकावले. तिच्या या कामगिरीमुळे तिची राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तसेच १७ वर्षांआतील मुलींच्या ६९ किलो वजनी गटात दिव्या भानुदास पाटील हिने आक्रमक व आत्मविश्वासपूर्ण खेळाचे दर्शन घडवत प्रथम स्थान मिळविले. विभागीय स्तरावर मिळविलेल्या या उल्लेखनीय विजयामुळे दिव्यानेही राज्यस्तरीय स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले आहे.
याच गटातील १७ वर्षांआतील मुलींच्या ४९ किलो वजनी गटात तनु वाल्मीक पाटील हिने अंतिम सामन्यापर्यंत मजल मारत उपविजेतेपद मिळविले. अंतिम फेरीत विजय थोडक्यात हुकला असला तरी तिची संपूर्ण स्पर्धेतील कामगिरी कौतुकास्पद ठरली.
विशेष म्हणजे, या तिन्ही खेळाडूंनी यापूर्वी जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून नाशिक विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळविली होती. विभागीय स्तरावरही त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी कायम ठेवत विद्यालयाच्या क्रीडा परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
विद्यालयाच्या कुस्तीपटूंच्या या यशामागे पर्यवेक्षक तथा आदर्श क्रीडा शिक्षक बी. डी. साळुंखे, ज्येष्ठ शिक्षक प्रा. रघुनाथ अरविंद पाटील तसेच राष्ट्रीय खो-खो पंच प्रा. प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या सरावापासून स्पर्धेपर्यंत शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचे हे यशस्वी फलित मानले जात आहे.
कुस्तीपटूंच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब प्रतापराव पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. पुनमताई पाटील, मंत्रालयीन उपसचिव दादासाहेब प्रशांतराव पाटील, प्राचार्य आर. आर. वळखंडे, पर्यवेक्षक बी. डी. साळुंखे, प्रभारी कार्यवाहक मनोजकुमार पवार तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.
विद्यालयातील कुस्तीपटूंनी जिल्ह्यापासून विभागीय स्तरापर्यंत सातत्यपूर्ण यश संपादन करत आपली क्रीडा गुणवत्ता सिद्ध केली आहे. आता प्रेरणा गणेश पाटील आणि दिव्या भानुदास पाटील या सुवर्णपदक विजेत्यांकडून राज्यस्तरीय स्पर्धेतही दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत असून, त्यांच्या यशाकडे संपूर्ण विद्यालयाचे तसेच क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

