इन्स्टाग्रामवर कपडे मागवणे पडले महागात; महिलेची ८७ हजारांची फसवणूक!
डिलिव्हरीच्या नावाखाली QR कोड आणि पेमेंट लिंकचा वापर; शहर पोलिसांत गुन्हा दाखल !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून कपड्यांची ऑनलाईन ऑर्डर देणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. कपड्यांची डिलिव्हरी देण्याच्या बहाण्याने सायबर भामट्यांनी महिलेच्या बँक खात्यातून तब्बल ८७ हजार २१९ रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी प्रीती मुकेश बांगड (वय ४१, रा. महावीर नगर) यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इन्स्टाग्रामवरून दिली कपड्यांची ऑर्डर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीती बांगड यांनी २४ ते २७ सप्टेंबरदरम्यान इन्स्टाग्रामवरील ‘लक्ष्मी कलेक्शन’ या पेजवरून कपड्यांची ऑर्डर दिली होती. त्यानंतर संशयितांनी ‘ग्लोबल डिलिव्हरी डिपार्टमेंट’च्या नावाचा वापर करून त्यांच्याशी संपर्क साधला आणि विश्वास संपादन केला.
QR कोड आणि पेमेंट लिंकचा वापर
कपड्यांचे पेमेंट आणि डिलिव्हरीच्या नावाखाली संशयितांनी प्रीती बांगड यांच्या व्हॉट्सॲपवर वेळोवेळी फोन केले. यावेळी त्यांना वेगवेगळे QR कोड आणि पेमेंट लिंक पाठविण्यात आल्या. तसेच लिंक उघडून विशिष्ट कोड क्रमांक टाकण्यास सांगण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.या प्रक्रियेदरम्यान त्यांच्या बँक खात्यातून एकूण ८७ हजार २१९ रुपये काढून घेतल्याचे समोर आले. ऑनलाईन खरेदीच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी ७ ऑक्टोबर रोजी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी: ऑनलाईन खरेदी करताना विक्रेत्याची विश्वासार्हता तपासावी. अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या पेमेंट लिंक उघडणे, संशयास्पद QR कोड स्कॅन करणे किंवा बँकिंगशी संबंधित गोपनीय माहिती शेअर करणे टाळावे.

