नापिकी आणि कर्जाच्या चिंतेत शेतकऱ्याची आत्महत्या !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शेतीतील नापिकी, घरावरील कर्ज आणि दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या ज्ञानेश्वर बाबुराव सपकाळे (वय ३५, रा. किनोद, ता. जळगाव) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १३ ऑक्टोबर रोजी घडली. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ज्ञानेश्वर सपकाळे यांच्यावर सहकारी सोसायटीचे कर्ज होते. याशिवाय शेतीसाठी उसनवारीने रक्कम घेतली होती आणि घरासाठी गृहकर्जही घेतले होते, अशी माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली.त्यांनी शेतात कापसाची लागवड केली होती. चांगले पीक आल्यास कर्जाची परतफेड करता येईल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे पीक हातचे जाण्याची भीती निर्माण झाल्याने ते चिंतेत असल्याचे सांगण्यात येते.
१३ ऑक्टोबर रोजी त्यांची पत्नी शेतात गेली असताना त्यांनी राहत्या घरी गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे किनोद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

