जुन्या वादातून तरुणावर गावठी कट्ट्यातून गोळीबार !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी अर्जुन रोहीदास राठोड (वय २५, रा. पंचमुखी हनुमान मंदिर परिसर) याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याची घटना १२ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास गणेशनगर परिसरात घडली. गोळी अर्जुनच्या कानाच्या मागील बाजूस अडकल्याने तो गंभीर जखमी झाला. जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन राठोड याचा दोन दिवसांपूर्वी हितेश गायकवाड ऊर्फ सामान आणि यश अंभोरे ऊर्फ सीके यांच्यासोबत वाद झाला होता. १२ ऑक्टोबर रोजी रात्री अर्जुन हा मित्र विशाल बागडे आणि आकाश भाट यांच्यासोबत रिधम हॉस्पिटलजवळ उभा होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी जुन्या वादावरून पुन्हा वाद घालण्यास सुरुवात केली.मित्रांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर हितेश गायकवाड याने गावठी कट्ट्यातून अर्जुनवर गोळी झाडल्याचा आरोप आहे. या गोळीबारात अर्जुन गंभीर जखमी झाला.
अर्जुनच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून हितेश गायकवाड, यश अंभोरे आणि अन्य एकाविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे.दरम्यान, दुसऱ्या गटातील यश अंभोरे यानेही फिर्याद दिली आहे. त्याच्या तक्रारीनुसार, अर्जुनने शिवीगाळ करून गावठी कट्टा दाखवत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच कमल बागडे याने चाकू दाखवून धमकी दिल्याचा उल्लेख आहे. या फिर्यादीवरून अर्जुन राठोड, कमल किरण बागडे आणि रोहित कचोरे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल वाघ करीत आहेत.

