घनकचरा संकलनात राजकारण.
ठेकेदाराचे काम समाधानकारक असतानाही ‘टक्केवारी’ न दिल्याने काही नगरसेवकांची तक्रारबाजी ?

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि. १४
नवरात्रोत्सव सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून यावल शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत ओला व सुका कचरा संकलनाचे काम अतिशय नियमित,वेळेवर आणि समाधानकारक पद्धतीने सुरू आहे.
नागरिकांकडूनही या कामाचे समाधान व्यक्त होत असतानाच, या चांगल्या कामाला गालबोट लावण्याचा प्रयत्न काही लोकप्रतिनिधींकडूनच होत असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, शहराचा घनकचरा संकलनाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने गेल्या पंधरा दिवसापासून आणि नवरात्रापासून संपूर्ण प्रभागांमध्ये घंटागाडी नियमित पाठवून कचरा संकलन सुरळीत केले आहे. यापूर्वी सणासुदीच्या काळात कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराबाबत तक्रारी येत होत्या मात्र यंदा तसे चित्र नाही.
परंतु हेच चांगले काम काही सदस्यांच्या डोळ्यात खुपत आहे. ठेकेदार हा काम व्यवस्थित करीत असल्याने आणि नियमानुसार काम करीत असल्याने,त्याने पाहिजे तशी ‘टक्केवारी’ देण्यास नकार दिला. याच रागातून त्या काही सदस्यांनी ठेकेदाराविरुद्ध वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रारीचा पाऊस पाडून केवळ ठेकेदारालाच नव्हे, तर नगरपरिषद प्रशासन आणि सर्वसामान्य यावलकरांना नाहक अडचणीत आणण्याचा प्रयत्न चालविला आहे.
सत्ताधारी की विरोधक ? शहरात चर्चेला उधाण —
तक्रार करणारे हे तथाकथित नगरसेवक नेमके सत्ताधारी गटातील आहेत की विरोधी गटातील ? यावरून यावल शहरात तर्कवितर्क लढवले जात आहेत.चांगल्या कामात अडथळा आणून शहर अस्वच्छ करण्याचा डाव कोणी आखला,असा सवाल नागरिक विचारत असून तक्रार करणाऱ्यांच्या पडद्यामागील सूत्रधाराबाबत सुद्धा चर्चा सुरू आहे.
अधिकाऱ्यांनी केवळ कागदी तक्रारीवर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष वस्तुस्थिती,घंटागाडीचे रूट,नागरिकांचे अभिप्राय आणि घनकचरा प्रकल्पावरील प्रत्यक्ष कामाची पाहणी करूनच योग्य ती कार्यवाही करावी,अशी मागणी होत आहे.
अवैध ठरलेले ठेकेदार गप्प तक्रार कोणत्याअधिकाराने —
या घनकचरा संकलनाचा ठेका देण्याच्या निविदा प्रक्रियेत ज्या ठेकेदारांच्या निविदा तांत्रिकदृष्ट्या अवैध ठरवण्यात आल्या, त्या ठेकेदारांनी कोणतीही तक्रार केलेली नाही. मग ज्या सदस्यांचा निविदा प्रक्रियेशी थेट संबंधही नाही,ते कोणत्या नियमानुसार आणि कोणत्या अधिकाराने आणि कोणत्या नैतिकतेने तक्रारी करीत आहेत ? याबाबतही यावल शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.
एकंदरीत,शहर स्वच्छ असताना, कचरा वेळेवर उचलला जात असताना केवळ वैयक्तिक स्वार्थ आणि टक्केवारीसाठी काही लोकप्रतिनिधी शहराचे आरोग्य धोक्यात घालत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून चांगले काम करणाऱ्या ठेकेदाराला सहकार्य करावे आणि तक्रारबाज सदस्यांचा बुरखा फाडावा, अशीच यावलकरांची अपेक्षा आहे.

