वरणगावात काँग्रेसचा ‘संविधान बचाव’चा एल्गार!
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी; ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची आक्रमक भूमिका
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी : निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित करत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने वरणगावात ‘संविधान बचाव’ रॅलीच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात आवाज बुलंद केला. शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जनजागृती रॅली काढण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा आणि ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे, अशा मागण्यांनी या आंदोलनातून जोर धरला.
काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. राजेश मानवतकर यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. विविध निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आणि भाजप सरकारला अनुकूल भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला. लोकशाही व्यवस्थेत निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे काम करणे अपेक्षित असताना आयोगाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मानवतकर यांनी केली.
‘ईव्हीएम नको, बॅलेट पेपरवरच मतदान हवे!’
२०२४ च्या निवडणुकीतील ईव्हीएमच्या वापराबाबतही मानवतकर यांनी आक्षेप नोंदवला. ईव्हीएममध्ये कथित गैरप्रकार झाल्याचा आरोप करत मतदारांच्या मतदानाच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ईव्हीएमऐवजी पारंपरिक बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची व्यवस्था लागू करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
लोकशाहीचा पाया असलेल्या मतदान प्रक्रियेवर जनतेचा विश्वास टिकवणे आवश्यक आहे. निवडणूक व्यवस्थेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि मतदारांचा अधिकार अबाधित राहावा, अशी भूमिका काँग्रेसने या रॅलीतून मांडली.
काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग
या रॅलीत काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. राजेश मानवतकर, शैलेश बोदडे, ज्येष्ठ नेते सुधाकर बडगुजर, शहराध्यक्ष अशफाक काझी, ज्येष्ठ नेते प्रा. मनोज देशमुख, शहर उपाध्यक्ष प्रकाश भैसे, अशोक इंगळे, विकास चौधरी, गुड्डू काझी, राजेश काकाणी, सैयद अझहर, सुभाष हळदे, अकील शहा, शिवाजी पाटील, जीवन पाटील, छोटू बिर्हाडे यांच्यासह असंख्य काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.
वरणगावातील या रॅलीच्या माध्यमातून काँग्रेसने निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, मतदारांचे अधिकार आणि संविधानाच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे.


