विभागीय मल्लखांब स्पर्धेत वरणगावचा निखिल भोई विजयी!
महात्मा गांधी विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी नाशिक येथे झालेल्या विभागस्तरीय शालेय शासकीय मल्लखांब स्पर्धेत वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालयाचा खेळाडू निखिल भोई याने दमदार कामगिरी करत विजय मिळविला. या यशामुळे त्याने राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले असून, त्याच्या यशाने वरणगावच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा परिषद क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ऑक्टोबर रोजी नाशिक येथील जिल्हा क्रीडा संकुलात विभागस्तरीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील १९ वर्षांखालील वयोगटात निखिल भोई याने उत्कृष्ट कौशल्य, चपळता आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश संपादन केले.
निखिलला क्रीडा शिक्षक आशिष चौधरी, लक्ष्मीकांत नेमाडे आणि सुनील चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत हरी बढे, संस्थेच्या अध्यक्षा वंदनाताई पाटील, संस्थेचे सर्व कार्यकारी मंडळ, विद्यालयाचे प्राचार्य सी. जे. तायडे, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
निखिलने राज्यस्तरीय स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करून विद्यालयाचा आणि वरणगावचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.

