Monday, October 19, 2026
Homeगुन्हाभुसावळच्या तुकाराम नगरात घरफोडी; ४.२४ लाखांचा ऐवज लंपास!

भुसावळच्या तुकाराम नगरात घरफोडी; ४.२४ लाखांचा ऐवज लंपास!

भुसावळच्या तुकाराम नगरात घरफोडी; ४.२४ लाखांचा ऐवज लंपास!

मुलीच्या शिक्षणासाठी ठेवलेली अडीच लाखांची रोकडही चोरट्यांनी पळवली; फॉरेन्सिक व श्वान पथकाकडून तपास !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील तुकाराम नगर परिसरात बंद घराला लक्ष्य करत चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल ४ लाख २३ हजार ९१५ रुपयांचा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे, पुण्यात शिक्षण घेणाऱ्या मुलीच्या शिक्षणासाठी घरात ठेवलेली अडीच लाख रुपयांची रोकडही चोरट्यांनी चोरून नेली. १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ही घरफोडी उघडकीस आली. या प्रकरणी १८ ऑक्टोबर रोजी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश
शहरातील मंदिराजवळ असलेल्या तुकाराम नगरातील दत्त म्हाळसाई इमारतीत लिलाधर पंडित बोरोले (वय ५९) हे कुटुंबासह राहतात. त्यांची मुलगी ऋतुजा पुणे येथे शिक्षण घेत असून, पत्नी सुनीता या दीपनगर येथे नोकरीला आहेत. १७ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास लिलाधर बोरोले हे डोळ्यांच्या उपचारासाठी स्वतःच्या वाहनाने जालना येथे गेले होते. सकाळी आठच्या सुमारास त्यांच्या पत्नी घराला कुलूप लावून कामावर गेल्या. त्यामुळे दिवसभर घर बंद होते. सायंकाळी साडेचारच्या सुमारास जालन्याहून घरी परतलेल्या बोरोले यांना घराचा मुख्य दरवाजा उघडा दिसला.दरवाजाची कडी-कोंडी तोडल्याचे लक्षात येताच त्यांनी घरात पाहणी केली. त्यावेळी दोन्ही शयनकक्षांतील सामान अस्ताव्यस्त पडलेले, तर कपाट फोडलेले दिसून आले. कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.सोन्याचे दागिने आणि अडीच लाखांची रोकड गायब चोरट्यांनी सुमारे साडेचार तोळ्यांची सोन्याची पोत (१ लाख १४ हजार ४९२ रुपये), पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या (२८ हजार ६२३ रुपये), दोन ग्रॅम वजनाच्या लहान मुलांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या (५ हजार ६०० रुपये), नऊ ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले (२५ हजार २०० रुपये) आणि मुलीच्या शिक्षणासाठी कपाटात ठेवलेली अडीच लाख रुपयांची रोकड असा एकूण ४ लाख २३ हजार ९१५ रुपयांचा ऐवज चोरून नेला.फॉरेन्सिक व श्वान पथकाकडून तपास घटनेची माहिती मिळताच बोरोले यांनी इमारतीतील अशोक तुकाराम बोरोले आणि मोहन दत्तू बोरोले यांना याबाबत कळवले. त्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकाला पाचारण करून पाहणी केली. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक जयेंद्र पगारे या घरफोडीचा पुढील तपास करीत आहेत.
शहरातील बंद घरांना लक्ष्य करून होणाऱ्या घरफोड्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या