रेशनच्या धान्याचा ट्रक उलटला; हमालाचा दुर्दैवी मृत्यू!
पाचोरा खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – पाचोरा येथून वरखेडीमार्गे भोजे येथे रेशनचे धान्य घेऊन जाणारा आयशर ट्रक उलटल्याने एका हमालाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी घडली. वळणावरील कठडे नसलेल्या नाल्यात ट्रक उलटल्याने हा अपघात झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, एमएच १९, १९४७ क्रमांकाचा आयशर ट्रक पाचोरा येथून भोजेच्या दिशेने रेशनिंगचे धान्य घेऊन जात होता. गुरुवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास वरखेडी मार्गावरील वळणावर ट्रक नाल्यात उलटला. त्यावेळी ट्रकमध्ये चालकासह तीन हमाल होते. हमाल गहू आणि तांदळाच्या गोण्यांवर बसलेले होते.या अपघातात संभाजी केरप्पा बावचे (रा. गिरणा पंपिंग रोड, गोकुळधामसमोर, पाचोरा) हे गव्हाच्या गोण्यांखाली दबले गेले. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, समोरून येणाऱ्या बसला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक उलटल्याचे सांगितले जात आहे.अपघातानंतर मृत संभाजी बावचे यांचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. या घटनेची पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
दरम्यान, वरखेडी येथे गुरुवारी आठवडे बाजार भरत असल्याने तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना अपघाताची माहिती मिळताच वरखेडी बीटचे पोलीस कॉन्स्टेबल नामदेव इंगळे आणि अतुल पवार यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.
या अपघातामुळे रेशनच्या धान्याची वाहतूक करताना सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

