ग्रामीण भागातील पाणीप्रश्नावर भर; अपूर्ण योजनांना गती देण्याचे करिश्मा नायर यांचे निर्देश
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – जळगाव जिल्ह्यात एल निनोच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचा धोका लक्षात घेता, जिल्ह्यातील अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी दिले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत आणि पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी संबंधित कंत्राटदार, अधिकारी आणि अभियंत्यांनी समन्वयाने कामे पूर्ण करावीत, असे आवाहन त्यांनी केले.जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात गुरुवारी (दि. २२ ऑक्टोबर) मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या अध्यक्षतेखाली पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पाणीपुरवठा योजनांचे कंत्राटदार तसेच संबंधित अधिकारी आणि अभियंते उपस्थित होते.
अपूर्ण योजनांच्या कामांचा आढावा
बैठकीत जिल्ह्यात सुरू असलेल्या तसेच अद्याप पूर्ण न झालेल्या पाणीपुरवठा योजनांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. संभाव्य पाणीटंचाईच्या काळात ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी या योजनांची कामे वेळेत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
समन्वय साधून कामांना गती द्या

अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी कंत्राटदार, संबंधित अधिकारी आणि अभियंत्यांनी परस्पर समन्वय राखावा. कामकाजात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून योजनांच्या अंमलबजावणीला गती द्यावी, असे निर्देश करिश्मा नायर यांनी दिले.
ग्रामीण भागाला दिलासा देण्यावर भर
संभाव्य पाणीटंचाईचा परिणाम कमी करण्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळू शकतो. त्यामुळे संबंधित यंत्रणेने जबाबदारीने काम करून योजनांच्या पूर्ततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.

