वर्षावासाची सांगता समाजसेवेने; ५०० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी
श्रावस्ती महिला बहुउद्देशीय संस्थेचा पुढाकार; धम्मविचार आणि समाजप्रबोधनाचा संदेश
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी वरणगाव ता भुसावळ : तथागत भगवान गौतम बुद्धांच्या करुणा, मैत्री आणि मानवतेच्या विचारांना कृतीची जोड देत श्रावस्ती महिला बहुउद्देशीय संस्था, निंभोरा बु. (कपिलनगर) यांच्या वतीने वर्षावासाची सांगता मोफत आरोग्य तपासणी शिबिराने करण्यात आली. शनिवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कपिलनगर (दीपनगर), ता. भुसावळ येथे आयोजित शिबिरात सुमारे ५०० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

श्रावस्ती महिला बहुउद्देशीय संस्था, इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), इंडियन डेंटल असोसिएशन (IDA), जळगाव आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
शिबिरात बालरोग, स्त्रीरोग, दंतचिकित्सा, त्वचारोग आणि सामान्य वैद्यकीय तपासणीसह विविध आजारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देण्यात आली. नागरिकांना वैद्यकीय सल्ला आणि गरजेनुसार मोफत औषधोपचाराची सुविधाही देण्यात आली.

वर्षावासाची सांगता धार्मिक कार्यक्रमापुरती मर्यादित न ठेवता समाजसेवेतून करण्याचा संस्थेचा प्रयत्न होता. बुद्धांच्या करुणेचा संदेश आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता व मानवी प्रतिष्ठेच्या विचारांना या उपक्रमातून उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमाला आरपीआयचे जळगाव जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळाभाऊ पवार आणि विनोदभाऊ सोनवणे उपस्थित होते.
संस्थेच्या अध्यक्षा सिताबाई प्रकाश गवई, उपाध्यक्षा मंगला इंगळे, सचिव रेखा प्रधान, उपसचिव मनिषा सुरवाडे यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. कपिलनगर मित्र परिवार आणि स्थानिक उपासक-उपासिकांचे सहकार्य लाभले.
आरोग्यसेवा, समाजप्रबोधन आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम साधणारा हा उपक्रम बुद्धांच्या मानवतावादी विचारांचा कृतीशील जागर ठरला.

