जीवनदान कपडा परिवारातर्फे गरजूंना कपडे, साड्या व पादत्राणांचे वाटप
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याच्या उद्देशाने जीवनदान कपडा परिवारातर्फे भुसावळ येथील वांजोळा रोड परिसरातील भारत गॅस गोडाऊनमागील पावरी वस्तीमध्ये गरजू कुटुंबांना कपडे व पादत्राणांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे लहान मुलांसह महिला व पुरुषांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
या उपक्रमांतर्गत लहान मुलांना व मुलींना नवीन ड्रेस, महिलांना साड्या, तर पुरुषांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकांना चपला, बूट व सँडल देण्यात आले. नवीन कपडे आणि पादत्राणे मिळाल्याने लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसून येत होता. त्यांच्या आनंदात सहभागी होत जीवनदान कपडा परिवाराच्या सदस्यांनाही मोठा आनंद मिळाला.
यावेळी जीवनदान कपडा परिवाराचे अध्यक्ष सतीश घनश्याम महाजन आणि उपाध्यक्ष पवन मुरलीधर भारंबे यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले.
कपडे दान करण्याचे आवाहन
गरजू व्यक्तींना मदतीचा हात देण्यासाठी नागरिकांनीही या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जीवनदान कपडा परिवारातर्फे करण्यात आले आहे. नागरिकांनी नवीन कपडे किंवा वापरण्यायोग्य जुने कपडे स्वच्छ धुऊन, व्यवस्थित इस्त्री करून दान करावेत, जेणेकरून ते गरजूंपर्यंत सन्मानाने पोहोचविता येतील.
संपर्क श्री. सतीश घनश्याम महाजन, अध्यक्ष, जीवनदान कपडा परिवार
मोबाईल : ९९२३७९१३९९ .

