नगराध्यक्ष सुनील काळेंचा दणका; बायपासने जाणाऱ्या बस वळविल्या वरणगावातून!
फुलगाव बायपासवर बस रोखून ठिय्या आंदोलन; तिकीट मशिनमध्ये थांबा नसल्याचे चालक-वाहकांचे स्पष्टीकरण, वरणगावातून बस नेण्याची मागणी
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी वरणगाव, ता. भुसावळ : वरणगाव शहराला बगल देत नाशिक, जळगाव आणि अकोला मार्गावरील बस थेट बायपास महामार्गाने जात असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. या प्रकाराची दखल घेत वरणगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी कार्यकर्त्यांसह फुलगाव बायपासवर धाव घेत बायपासने जाणाऱ्या बस रोखल्या. बसचालक व वाहकांना जाब विचारत त्यांनी बस वरणगाव शहरातून नेण्याची ठाम मागणी केली. त्यांच्या या भूमिकेमुळे बससेवेचा प्रश्न ऐरणीवर आला.
अनेक महिन्यांपासून नाशिक, जळगाव आणि अकोला मार्गावरील काही बस वरणगावात न येता थेट बायपासने जात असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात होती. सणासुदीच्या दिवसांतही हा प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. अखेर नगराध्यक्ष सुनील काळे यांनी कार्यकर्त्यांसह फुलगाव बायपासवर बस थांबवून चालक आणि वाहकांकडे विचारणा केली.
यावेळी तिकीट मशिनमध्ये वरणगाव थांब्याची नोंद नसल्याने बस बायपासने जात असल्याचे चालक व वाहकांनी सांगितले. मात्र, वरणगावची लोकसंख्या ६० हजारांपेक्षा अधिक असून, शहराला सुमारे ३० खेडी जोडलेली आहेत. शहरातून मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची ये-जा असताना बस वरणगावात का आणल्या जात नाहीत, असा सवाल काळे यांनी उपस्थित केला.
बससमोर ठिय्या; महामंडळाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती
बस वरणगावातून नेण्याच्या मागणीसाठी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी अकोला-नाशिक बससमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अधिकारीही उपस्थित होते. तिकीट मशिनमध्ये थांब्याची नोंद नसल्याचे कारण पुढे करून प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.
प्रवाशांची गैरसोय थांबणार का?
वरणगावसारख्या मोठ्या शहराला बगल देऊन बस बायपासने जात असल्याने विद्यार्थी, नोकरदार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही बस रिकाम्या जात असताना प्रवाशांना मात्र बसची प्रतीक्षा करावी लागत असल्याची बाबही उपस्थित करण्यात आली. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तिकीट मशिनमध्ये वरणगाव थांब्याची नोंद तातडीने उपलब्ध करून देऊन संबंधित मार्गावरील बस नियमितपणे शहरातून सुरू कराव्यात, अशी मागणी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केली. त्यांच्या हस्तक्षेपानंतर बायपासने जाणाऱ्या बस वरणगावातून नेण्याबाबत काय कार्यवाही होते, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

