Tuesday, November 3, 2026
Homeजळगावदुष्काळात सातबारा कोरा करा, लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्या’; अंबादास दानवेंचा सरकारवर...

दुष्काळात सातबारा कोरा करा, लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्या’; अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल!

रावेरमध्ये शिवसेना उबाठाचा सरकारविरोधात एल्गा

दुष्काळात सातबारा कोरा करा, लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्या’; अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल!

स्मार्ट मीटरविरोधात संतापाचा आवाज; घरकुलासाठी पाच लाखांची मागणी, ११ मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन

रावेर   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

दुष्काळाच्या संकटाने शेतकरी हवालदिल, महागाईने सर्वसामान्य नागरिक त्रस्त आणि वाढत्या खर्चाने सामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले असताना सरकारने जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नये, असा आक्रमक पवित्रा घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रावेरमध्ये जनआक्रोश मोर्चा काढला. माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या मोर्चातून सरकारला धारेवर धरत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, सर्वसामान्यांच्या घरांमध्ये स्मार्ट मीटर बसवणे बंद करा, लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये द्या आणि घरकुल योजनेचे अनुदान पाच लाख रुपये करा, अशा प्रमुख मागण्या केल्या.
रावेर शहरातील छोरिया मार्केट येथून शिवसेना उबाठाच्या जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून पुढे जात तहसीलदार कार्यालयावर धडकला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी महागाईच्या मुद्द्यावरून भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधत शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली.
शेतकरी, महिला आणि गरिबांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सातबारा कोरा करावा, सर्वसामान्य नागरिकांवरील स्मार्ट मीटरची सक्ती थांबवावी, लाडकी बहीण योजनेतील महिलांना दरमहा २१०० रुपये द्यावेत, तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील घरकुल लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांचे अनुदान द्यावे, या मागण्यांवर दानवे यांनी भर दिला.
महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि घरकुल लाभार्थ्यांच्या अपेक्षा यांना वाचा फोडण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध प्रश्नांबाबतच्या ११ प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले.

मोर्चात शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या मोर्चात शिवसेना उबाठाचे उपनेते गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख योगिराज पाटील, कुलभूषण पाटील, उपजिल्हाप्रमुख रवींद्र पवार, महिला जिल्हाप्रमुख प्रतिभाताई जगदाळे, प्रल्हाद महाजन, तालुकाप्रमुख प्रमोद कोंडे, तालुका उपप्रमुख मुकेश पाटील, शाम भांबरे, तालुका संघटक संतोष महाजन, अल्पसंख्याक तालुकाप्रमुख वसीम खान, निलेश महाजन, माजी शिवसेना प्रमुख अविनाश पाटील, यावल तालुकाप्रमुख शरद कोळी आणि युवासेना तालुकाप्रमुख किरण पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मोर्चाचे सूत्रसंचालन अशोक शिंदे यांनी केले. या जनआक्रोश मोर्चात सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विविध मागण्यांमुळे रावेरमधील राजकीय वातावरण तापले असून, आता शासन या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या