Tuesday, October 27, 2026
Homeगुन्हाफत्तेपुर पोलिसांची गुटख्याविरोधात कारवाई; १ लाखांचा मुद्देमाल जप्त! इलेक्ट्रिक स्कूटरसह प्रतिबंधित विमल...

फत्तेपुर पोलिसांची गुटख्याविरोधात कारवाई; १ लाखांचा मुद्देमाल जप्त! इलेक्ट्रिक स्कूटरसह प्रतिबंधित विमल पानमसाला व सुगंधित तंबाखू जप्त; एकाला अटक 

फत्तेपुर पोलिसांची गुटख्याविरोधात कारवाई; १ लाखांचा मुद्देमाल जप्त! इलेक्ट्रिक स्कूटरसह प्रतिबंधित विमल पानमसाला व सुगंधित तंबाखू जप्त; एकाला अटक   जळगाव    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी      : प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध फत्तेपुर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत १ लाख ६ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका २१ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले आहेत. त्यानुसार फत्तेपुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांनी अवैध गुटखा वाहतुकीविरोधात कारवाई करण्यासाठी पोलीस पथकाला सूचना दिल्या होत्या.

गुप्त माहितीच्या आधारे सापळा

२२ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत फत्तेपुर ते कसबापिंप्री रस्त्यादरम्यान एका व्यक्तीकडून प्रतिबंधित विमल पानमसाला व V-1 सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी हिंगणे फाट्याजवळ सापळा रचला. रात्री सुमारे १०.३० वाजता प्रसाद दामू वाणी (वय २१, रा. चिंचोलीपिंप्री, ता. जामनेर, जि. जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून प्रतिबंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली इलेक्ट्रिक स्कूटर जप्त करण्यात आली.

१ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत पोलिसांनी २९ हजार ४० रुपये किमतीचा विमल पानमसाला, ७ हजार २६० रुपये किमतीची V-1 सुगंधित तंबाखू आणि ७० हजार रुपये किमतीची MH-19-EY-1357 क्रमांकाची इलेक्ट्रिक स्कूटर असा एकूण १ लाख ६ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी अन्न व सुरक्षा अधिकारी किशोर हिंमतराव बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २३ ऑक्टोबर २०२६ रोजी फत्तेपुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक २३५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमे आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ मधील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी प्रसाद दामू वाणी याला २३ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला २४ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि चाळीसगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

फत्तेपुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश महाजन, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणी तडवी, पोलीस कॉन्स्टेबल भूषण पाटील, चेतन तांगडे आणि अरुण पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश महाजन करीत आहेत.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध जळगाव जिल्हा पोलीस दलाकडून कारवाई करण्यात येत आहे. अशा अवैध व्यवसायांची माहिती नागरिकांना मिळाल्यास त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा डायल ११२ वर माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या