वरणगावच्या सिद्धेश्वर नगर रेल्वे पुलाचे काम अंतिम टप्प्यात; रस्त्याच्या कामालाही सुरुवात
दिवाळीच्या आसपास पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता; स्लॅबचे काम अद्याप बाकी
वरणगाव, खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी : वरणगाव शहरातील सिद्धेश्वर नगर रेल्वे पुलाचे काम गेल्या चार महिन्यांपासून सुरू असून, आता हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुलालगतच्या रस्त्याच्या कामालाही सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांच्या आशा उंचावल्या आहेत. पुलावरील स्लॅबचे काम अद्याप बाकी असले, तरी दिवाळीच्या आसपास पूल आणि रस्ता वाहतुकीसाठी सुरू होण्याची शक्यता दिसत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई-नागपूर तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत वरणगाव येथील सिद्धेश्वर नगर रेल्वे पुलाचे कामही हाती घेण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या कामाला आता वेग मिळाला असून, पुलाच्या परिसरातील रस्त्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे.
विल्हाळे आणि सिद्धेश्वर नगरकडे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे पुलाखाली भिंत बांधून गटार बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे पुलाखालील आवश्यक कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जात आहेत. मात्र, पुलावरील स्लॅबचे काम पूर्ण होणे आणि त्यानंतर रस्त्याचे काम मार्गी लागणे आवश्यक आहे.
पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर सिद्धेश्वर नगरसह परिसरातील नागरिकांची ये-जा अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. सध्या सर्वांचे लक्ष पुलाच्या उर्वरित कामाकडे लागले असून, दिवाळीच्या आसपास हा मार्ग सुरू होतो का, याकडे नागरिकांचे लक्ष आहे. मात्र, पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची अधिकृत तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही.

