वाळूमाफियांवरील कारवाईसाठी रात्री थेट नदीपात्राकडे धाव; तहसीलदार जखमी!
बदलीच्या उंबरठ्यावरही कर्तव्याला प्राधान्य; दुचाकी घसरल्याने पायाला गंभीर दुखापत
भडगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – अवैध वाळू उपशाविरोधात प्रत्यक्ष पाहणीसाठी रात्रीच्या वेळी नदीपात्राकडे जात असताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात भडगावच्या तहसीलदार शीतल सोलाट जखमी झाल्या. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, डॉक्टरांनी त्यांना १५ दिवस सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या तलाठ्यालाही मुका मार लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव परिसरातील नदीपात्रातून रात्री अवैध वाळू उपसा आणि वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी तहसीलदार शीतल सोलाट यांनी आमडदे येथील तलाठ्याच्या खासगी दुचाकीवरून घटनास्थळाकडे जाण्याचा निर्णय घेतला.रात्री सुमारे नऊ वाजेच्या सुमारास वाक रस्त्याने नदीपात्राकडे जात असताना कच्च्या रस्त्यावरील खडी आणि निसरड्या मातीमुळे दुचाकीचे चाक घसरले. त्यामुळे दुचाकीवरील दोघेही खाली पडले. दुचाकी अंगावर आल्याने तहसीलदार सोलाट यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्या पायाला टाके घातले असून, १५ दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
पदोन्नतीनंतरही कर्तव्यनिष्ठेची चर्चा
तहसीलदार शीतल सोलाट यांची नुकतीच वरिष्ठ संवर्गात पदोन्नती झाली आहे. पुढील महिन्यात त्यांच्या नवीन पदस्थापनेचे आदेश मिळण्याची अपेक्षा असतानाही त्यांनी अवैध वाळू उपशाच्या पाहणीला प्राधान्य दिले. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेची तालुक्यात चर्चा सुरू आहे.दरम्यान, या घटनेनंतर अवैध वाळू उपशाविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

