सुसरी शिवारात विजेचा धक्का लागून पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; गावावर शोककळा
मुलीच्या साखरपुड्यापूर्वीच काळाचा घाला; दोन मुली, मुलगा आणि वृद्ध आईचा आधार हरपला
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी वरणगाव ता भुसावळ
भुसावळ तालुक्यातील सुसरी शिवारात कांद्याच्या शेतात काम करत असताना विजेचा धक्का लागून पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. अशोक बाबूराव पाटील (वय ५५) आणि सरीता अशोक पाटील (वय ४३, रा. सुसरी, ता. भुसावळ) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. या घटनेमुळे सुसरी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अशोक पाटील आणि त्यांची पत्नी सरीता पाटील हे सोमवारी सकाळी मजुरांसह शेतात कामासाठी गेले होते. सुसरी शिवारातील गट क्रमांक १२८/१ मधील त्यांच्या शेतात कांद्याचे पीक लावले होते. पिकामध्ये मोठ्या प्रमाणात गवत आणि तण वाढल्याने पती-पत्नी ते काढण्याचे काम करीत होते.
दरम्यान, शेतातील विजेच्या खांबावरील अर्थिंगची तार तुटून किंवा खाली पडून गवतात असल्याचे सांगण्यात येत आहे. गवत काढत असताना ही तार अशोक पाटील यांच्या संपर्कात आल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. पतीला विजेचा धक्का लागल्याचे पाहून जवळच असलेल्या सरीता पाटील यांनाही विजेचा धक्का बसला. या दुर्दैवी घटनेत दोघेही गंभीररीत्या बाधित झाले.
घटनेनंतर दोघांना तातडीने वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले. शेतात काम करताना घडलेल्या या दुर्घटनेने परिसरातील शेतकरी वर्गातही हळहळ व्यक्त होत आहे.
मुलीच्या साखरपुड्यापूर्वीच कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अशोक पाटील यांच्या मुलीचा साखरपुडा येत्या १ नोव्हेंबर रोजी होणार होता. घरात आनंदाचा आणि मंगलकार्याच्या तयारीचा माहोल असतानाच काळाने पती-पत्नीवर घाला घातल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा आणि आई असा परिवार आहे. या घटनेमुळे कुटुंबाचा आधार हरपला असून गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुखराम सावकारे पुढील तपास करीत आहेत. शेतातील विद्युत तार नेमकी कशामुळे खाली पडली कारण स्पष्ट झाले नाही .

