रावेरमध्ये २० हजारांची लाच घेताना वनरक्षकाला रंगेहाथ पकडले!
मंगरूळ धरणातून गाळ काढण्याच्या कामासाठी ५० हजारांची मागणी; जळगाव एसीबीची कारवाई
रावेर खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात मंगरूळ धरणातून गाळ काढण्याच्या कामाच्या मोबदल्यात ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी २० हजार रुपये स्वीकारणाऱ्या वनरक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जळगाव पथकाने बुधवारी (दि. २८ ऑक्टोबर) रंगेहाथ पकडले. जगदीश काशिनाथ जगदाळे (वय २७) असे कारवाई करण्यात आलेल्या वनरक्षकाचे नाव असून, या कारवाईमुळे वन विभागातील कथित लाचखोरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गाळ काढण्याच्या कामासाठी मागितली लाच
या प्रकरणातील तक्रारदार रावेर येथील अर्थमूव्हर्स एजन्सीचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे स्वतःचे जेसीबी मशीन आहे. तक्रारदारांच्या परिचित व्यक्तीने स्वतःच्या तसेच नातेवाईकांच्या नावे मंगरूळ धरणातून शेतीकामासाठी गाळ काढून त्याची वाहतूक करण्याचा परवाना पाटबंधारे उपविभाग, रावेर येथून घेतला होता.धरणातून गाळ काढण्याचे संबंधित ठिकाण वनरक्षक जगदाळे यांच्या कार्यक्षेत्रात येते. या कामाच्या मोबदल्यात जगदाळे यांनी तक्रारदाराकडे जेसीबी मशीनद्वारे गाळ काढण्यासाठी २० हजार रुपये, तर त्यांच्या परिचित व्यक्तीने ट्रॅक्टरद्वारे गाळाची वाहतूक केल्याच्या बदल्यात ३० हजार रुपये, अशी एकूण ५० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती.
एसीबीने रचला सापळा
तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने बुधवारी रावेर शहरातील छोरिया मार्केट परिसरातील एका चहाच्या हॉटेलमध्ये पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. यावेळी जेसीबीद्वारे गाळ काढण्याच्या कामाच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच मागितल्याचे आणि ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे पडताळणीत निष्पन्न झाल्याची माहिती आहे.यानंतर रावेर-बऱ्हाणपूर मार्गावरील साईनाथ ज्यूस सेंटर येथे एसीबीने सापळा रचला. तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना वनरक्षक जगदाळे यांना पथकाने रंगेहाथ पकडले. कारवाईनंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. अटकेसंदर्भातील पुढील कार्यवाही तसेच रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई एसीबी जळगावचे पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या नेतृत्वाखाली आणि पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोलीस हवालदार किशोर महाजन तसेच पोलीस अंमलदार भूषण पाटील, प्रणेश ठाकूर, राकेश दुसाने आणि मनोज पाटील यांचा सहभाग होता.नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

